हायलाइट्स:
- जिल्हा परिषदेच्या जागांसाठी आज मतमोजणी
- नागपुरात काँग्रेसचे एकहाती यश
- भाजप, राष्ट्रवादीला धक्के
म. टा. प्रतिनिधी, नागपूरः जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकांमध्ये क्रीडा मंत्री सुनील केदारांच्या नेतृत्वात काँग्रेसने एकहाती यश मिळविले. दुसरीकडे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या गृहजिल्ह्यात भाजपला बरेच धक्के बसलेत. भाजपचे माजी विरोधी पक्ष नेते अनिल निधान यांनाही काँग्रेसने धुळ चारली आहे. राष्ट्रवादीलासुद्धा माजी मंत्री अनिल देशमुखांच्या अनुपस्थितीचा चांगलाच फटका बसला आहे. त्या तुलनेत गोंडवाना गणतंत्र पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षासारख्या छोट्या पक्षांनी चमकदार कामगीरी करीत प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवित आपले अस्तित्व कायम राखले. मात्र, राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेसारख्या जुन्या पक्षाला या पोटनिवडणुकीत खातेसुद्धा उघडता आलेले नाही.
जिल्हा परिषदेच्या १६ जागांवरील ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविल्याने येथे पोटनिवडणुका घेण्यात आल्या. यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापने आघाडी करीत अनुक्रमे १०, ५ आणि एका जागेवर ही निवडणूक लढविली. मुळातच आक्रमक शैली असलेले मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात काँग्रेसने १० पैकी ९ जागांवर यश प्राप्त केले. तुलनेने अनिल देशमुखांच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादीची मात्र वाताहात झाली. पक्षाला ५ पैकी केवळ २ जागांवरच यश मिळविता आले. या निवडणुकांमध्ये सर्वाधिक धक्के हे भाजपला बसल्याचे दिसून येते. पक्षाने १६ही जागांवर निवडणूक लढविली. मात्र केवळ ३च जागांवर विजय प्राप्त होऊ शकता. तर शिवसेनेला या निवडणुकीत लढविलेल्या १०ही जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या निवडणुकीत काँग्रेसने केवळ एकच अर्थात बोथिया पालोरा येथील जागा गमावली आहे. येथे काँग्रेसला पराभूत करण्याचे श्रेय गोंडवाना गणतंत्र पक्षाला जाते. शेतकरी कामगार पक्षानेसुद्धा गेल्यावेळेसची जागा परत बळकावली आहे.
वाचाः फडणवीस, गडकरींच्या जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का; काँग्रेसने बाजी मारली
‘केदार’च नाथ…
गेल्या निवडणुकीप्रमाणेच यंदाही केदारांनी प्रचारसभांचा सपाटा लावला होता. व्यक्तिगत जनसंपर्कावरही बराच भर दिला. केदारांनी काँग्रेसखेरीज हिंगणा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्याही उमेदवारांचा प्रचार केला. काँग्रेसला मिळालेल्या यशात केदारांचा सिंहाचा वाटा असल्याचे कार्यकर्ते बोलून दाखवित आहेत. याखेरीज पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, नाना गावंडे यांनीही प्रचारात आघाडी घेतली होती. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीसुद्धा एका प्रचारसभेला हजेरी लावली.
अदृष्य शक्तीने भाजपला तारले!
इतर सर्वच ठिकाणी सपाटून मार खालेल्या भाजपने काटोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री अनिल देशमुखांच्या अनुपस्थितीत तेथील चारही जागांवर लक्ष केंद्रीत केले होते. एका अदृष्य अशा शक्तीने भाजपला तारल्याचे सांगितले जात आहे. डॉ. आशिष देशमुखांनी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केल्याची छायाचित्रे आणि व्हिडीओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या. मात्र, यावर काँग्रेस अथवा भाजपतर्फे अधिकृतरीत्या काहीच स्पष्टीकरण देण्यात आले नव्हते. अखेर कसेबसे येथील दोन जागांवर भाजपला यश प्राप्त झाले. याखेरीज हिंगणा तालुक्यातील डिगडोह इसासनी येथे भाजपला विजय मिळविता आला.
वाचाः नागपुरात आधी भाजपच्या विजयाची घोषणा, नंतर १० मिनिटांत निकाल बदलला अन्…
गडकरी, फडणवीसांची अनुपस्थिती भोवली
यंदा भाजपची प्रचाराची भिस्त ही प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, आमदार समीर मेघे, आमदार परीणय फुके, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांच्यावर होते. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींनी मात्र या पोटनिवडणुकांकडे फारसे लक्ष दिले नाही. या दोघांची एकही प्रचारसभा झाली नाही. पक्षाचा याचा मोठा बसल्याचे बोलले जात आहे.
विरोधी पक्ष नेत्याचा पराभव
भाजपचे माजी गट नेते अनिल निधान यांच्या गुमथळा सर्कलमध्ये झालेल्या बंडखोरीमुळे तेथे पक्षाचे चिन्ह गोठले होते. येथे काँग्रेसचे दिनेश ढोले यांनी निधान यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. तसेच भाजपने यापूर्वी विजय प्राप्त केलेल्या निलडोह आणि राजोला या दोन्ही जागासुद्धा गमावल्या. गत निवडणुकीतील केवळ इसासनी डिगडोह येथे भाजपला विजय प्राप्त करता आला.
वाचाः अनिल देशमुखांना मोठा धक्का; दोन महत्त्वाच्या जागा भाजपच्या ताब्यात
जिल्हा परिषद अंतिम निकाल
एकूण जागा १६
काँग्रेस- ९
भाजप- ३
राष्ट्रवादी-२
शेकाप – १
गोंडवाना गणतंत्र प- १
शिवसेना-०
इतर-०
नागपूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल
०१) केळवद- सुमित्रा कुंभारे- काँग्रेस
०२) वाकोडी- ज्योती सिरसकर- काँग्रेस
०३) राजोला- अरुण हटवार- काँग्रेस
०४) गुमथाळा- दिनेश ढोल- काँग्रेस
०५) वदोडा-अवंतीका लेकुरवाळे- काँग्रेस
०६) आरोली- योगेश देशमुख- काँग्रेस
०७) करंभाड- अर्चना भोयर- काँग्रेस
०८) निलडोह- संजय जगताप- काँग्रेस
०९) गोधणी (रेल्वे)- कुंदा राऊत- काँग्रेस
१०) येनवा- समीर उमप- शेकाप
११) डिगडोह-रश्मी कोटगुले- राष्ट्रवादी
१२) भिष्णुर- प्रवीण जोध राष्ट्रवादी
१३) बोथीय पालोर- हरिष उईके- गोंडवाना
१४) पारडशिंगा- मीनाक्षी सरोदे- भाजप
१५) सावरगाव – पर्वता काळबांडे- भाजप
१६) डिगडोह-इससानी- अर्चना गीरी- भाजप
जिल्हा परिषदेतील संख्याबळ
जुने नवे
काँग्रेस-३० ३२
भाजप-१५ १४
राष्ट्रवादी-१० ८
शिवसेना-१ १
शेकाप-१ १
गोगंप-० १
अपक्ष- १ १
एकूण-५८ ५८