Revanna Case: सिद्धरामय्या -कुमारस्वामी यांच्यात जुंपली; रेवण्णा प्रकरणावरुन वाक्‌युद्ध वैयक्तिक पातळीवर

वृत्तसंस्था, बेंगळुरू : कर्नाटकातील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यातील सुरू असलेले शाब्दिक युद्ध शनिवारी वैयक्तिक पातळीवर पोहोचले. सिद्धरामय्या यांच्या मुलाचे आठ वर्षांपूर्वी परदेशी निधन झाल्याचा मुद्दा कुमारस्वामी यांनी उपस्थित केला. सिद्धरामय्या यांनी या प्रकरणी तेव्हा तपासाचा आदेश का दिला नाही, असा प्रश्न कुमारस्वामी यांनी विचारला.

‘आपला नातू आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी खासदार प्रज्वल रेवण्णा परदेशात जाणार असल्याचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांना माहिती होते,’ असा आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नुकताच केला होता. त्यावर आक्षेप घेऊन कुमारस्वामी यांनी ‘सिद्धरामय्या यांनी २०१६मध्ये आपल्या मुलाला मरण्यासाठी परदेशात पाठवले होते का,’ असा सवाल केला. २०१६मध्ये राकेश यांच्या परदेश दौऱ्यादरम्यान त्यांच्यासोबत किती जण होते, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

प्रज्वल रेवण्णा लैंगिक अत्याचार प्रकरणाचा वापर आपल्या कुटुंबाला राजकीयदृष्ट्या संपविण्यासाठी केला जात आहे, असा आरोपही कुमारस्वामी यांनी केला. ज्यांनी पीडितांचे चेहरे ‘ब्लर’ केल्याशिवाय व्हिडिओ प्रसारित केले, त्यांनी गुन्हा केला आहे, असे ते म्हणाले.

प्रज्वल यांचा पासपोर्ट रद्द करण्याच्या केल्या जाणाऱ्या मागणीवर कुमारस्वामी म्हणाले, ‘सर्व नेते डिप्लोमॅटिक पासपोर्टबद्दल बोलत आहेत; परंतु त्यांना कायद्याची माहिती नाही. कारण डिप्लोमॅटिक पासपोर्ट ताबडतोब रद्द केला जाऊ शकत नाही.’

सिद्धरामय्या यांचे प्रत्युत्तर

कुमारस्वामी यांच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, ‘राकेश सिद्धरामय्या याच्या मृत्यूला आठ वर्षे झाली आहेत. आता हे प्रकरण समोर आणणे हा मूर्खपणा आहे. राजकीय कारणांसाठी हे केले जात आहेत. या घटनेत आणि प्रज्वलवरील आरोपांबाबत काय समानता आहे?’ ‘प्रज्वल यांचा पासपोर्ट रद्द करण्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहून १५ दिवस झाले आहेत. एसआयटीने एक पत्र लिहिले होते. त्यांना आणखी काय हवे आहे? त्यांनी तपासात त्रुटी शोधू नयेत,’ असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.

‘एप्रिलमधील पत्राचे काय झाले?’

बेंगळुरू : खासदार प्रज्वल रेवण्णा यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट जप्त करण्याची कर्नाटक सरकारची विनंती आपल्याला २१ मे रोजी प्राप्त झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिल्यानंतर कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी शनिवारी केंद्र सरकारवर निशाणा साधला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एप्रिलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्राचे काय झाले? पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती परराष्ट्र मंत्रालयाला दिली नाही का, असा सवालही त्यांनी विचारला.

Source link

karnataka govtkumaraswamyPrajwal Revanna caseprajwal revanna obscene video casesiddaramaiah
Comments (0)
Add Comment