गेमिंग झोनमध्ये १५००-२००० लिटर डिझेल आणि कार रेसिंगसाठी १००० ते १५०० लीटर पेट्रोल साठवण्यात आलं होतं. पण, सुदैवाने ही आग त्या पेट्रोल-डिझेलपर्यंत पोहोचली नाही, अन्यथा आणखी मोठी जिवीतहानी झाली असती. या गेमिंग झोनमधून बाहेर निघायला आणि प्रवेशासाठी ६ ते ७ फुटांचा एकत रस्ता होता. त्यामुळे सर्वांना बाहेर येता आले नाही.
जे या घटनेत बचावले गेले त्यांनी सांगितलं की शनिवारी संध्याकाळी जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा अचानक तिथल्या स्टाफने येऊन सांगितलं की लवकर बाहेर निघा येथे आग लागली आहे. त्यानंतर सगळीकडे पळापळ झाली आणि लोक बाहेर निघायचा प्रयत्न करु लागले, पण, सगळे बाहेर येऊ शकले नाही. कारण, पहिल्या मजल्यावरुन बाहेर येण्यासाठी एकच रस्ता होता. ही आग इतकी भीषण होती की त्यात होरपळेलेल्या लोकांची ओळख करणेही कठीण झालं आहे. डीएनए चाचणीने त्यांची ओळख पटवली जाणार आहे.
राजकोटमधील सर्व गेमिंग झोन बंद
सुमारे साडेचार तासांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले. आगीचे कारण तत्काळ स्पष्ट होऊ शकले नाही. आगीच्या कारणांचा शोध घेण्यात येत असल्याचे राजकोट पोलिस आयुक्त राजू भार्गव यांनी सांगितले. राजकोटमधील सर्व गेमिंग झोन तूर्त बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या दुर्घटनेनंतर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी प्रशासनाला वेगवान बचाचकार्याचे आदेश दिले. दुर्घटनेतील जखमींवर तातडीने उपचाराच्या सूचनाही त्यांनी दिल्या.