लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदानादरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी सकाळी कुटुंबीयांसह दिल्लीत मतदान केल्याचे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केले. त्यांची ती छायाचित्रे पुन्हा पोस्ट करून पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी, ‘शांतता आणि सौहार्द, द्वेष आणि अतिरेकी शक्तींचा पराभव करेल, अशी माझी इच्छा आहे,’ अशी पोस्ट केली.
चौधरी यांना प्रत्युत्तर देताना केजरीवाल यांनी, ‘चौधरी साहेब, मी आणि माझ्या देशातील नागरिक आमचे प्रश्न हाताळण्यास पूर्णपणे सक्षम आहोत. तुमच्या ट्वीटची गरज नाही. सध्या पाकिस्तानची परिस्थिती हलाखीची आहे. तुम्ही तुमच्या देशाची काळजी घ्या. भारतात होणाऱ्या निवडणुका हा आमचा अंतर्गत विषय आहे. दहशतवादाच्या सर्वांत मोठ्या प्रायोजकांचा आमच्या निवडणुकीतील हस्तक्षेप भारत खपवून घेणार नाही,’ अशा शब्दांत फटकारले.
यानंतरही फवाद चौधरी यांनी पुन्हा ट्वीट केले. ‘मुख्यमंत्री साहेब. निवडणूक प्रचार हा तुमचा स्वतःचा मुद्दा आहे; परंतु पाकिस्तान असो वा भारत, दहशतवादाची समस्या सर्वांसाठी धोकादायक आहे. प्रत्येकाने या समस्येची काळजी घेतली पाहिजे. पाकिस्तानची परिस्थिती खूप वाईट आहे; परंतु नागरिकांनी चांगला समाज घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भारतातील राजकारण्यांचे भाषण पाकिस्तानवर टीका केल्याशिवाय पूर्ण होत नाही, तर पाकिस्तानमध्ये भारतीय राजकारणाची कोणालाच पर्वा नाही. मुस्लिमविरोधी भावना व्यक्त करण्यासाठी भाजप पाकिस्तानचा वापर करीत आहे,’ असे उत्तर चौधरी यांनी दिले.
भाजपकडून टीका
केजरीवाल व पाकिस्तानी नेत्यांतील या जुगलबंदीवर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी टीका केली. रिरीजू म्हणाले, की केवळ राहुल गांधीच नाही, तर अरविंद केजरीवाल यांनाही पाकिस्तानमध्ये मोठा पाठिंबा आहे. फवाद यांनी असे वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांनी राहुल गांधींचाही एक ट्वीट रीट्विट केले होते, त्याकडेही रिजीजू यांनी लक्ष वेधले. यावर भाजप नेते शहजाद पूनावाला म्हणाले, की ‘यापूर्वी हाफिज सईदने काँग्रेस हा त्याचा आवडता पक्ष असल्याचे म्हटले होते. फवाद चौधरीच्या पोस्टमुळे काँग्रेसच नव्हे; तर विरोधी नेत्यांचाही हात पाकिस्तानसोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे.’