आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आणि आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्दैवी घटनेत लोकांना आपला अमूल्य जीव गमवावा लागल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर याप्रकरणी रात्री उशीरा एसआयटी स्थापन करुन चौकशीचे आदेश देखील देण्यात आले आहेत.
याप्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायाधीश बीरेन वैष्णव आणि देवेन देसाई यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. यावर न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले आहे की, ‘ही मानवनिर्मित आपत्ती आहे.’ या घटनेत लहान मुलांना जीव गमावावा लागल्याने उच्च न्यायालयाने या घटनेची दखल घेतली आहे.
न्यायालयाने म्हटले की, गेमिंग झोनच्या निर्माणात आणि संचालनात योग्य नियमांचे पालन केले गेले नाही. यासोबतच अहमदाबाद मध्ये सिंधुभवन रोड, सरदार पटेल रिंग रोड आणि एसजी हायवे वरील गेमिंग झोनचा सार्वजनिक सुरक्षेला धोका आहे. उच्च न्यायालयाने यासंदर्भात अहमदाबाद, वडोदरा, सूरत आणि राजकोट नगरच्या पालिका प्रशासनाकडून स्पष्टीकरण सुद्धा मागितले आहे.
न्यायालयाने आपल्या सुनावणीत पुढे म्हटले की, कायद्यातील कोणत्या तरतुदीनुसार या गेमिंग झोनला चालवण्याची परवानगी दिली गेली होती. तसेच उच्च न्यायालयाने आदेश दिले की, संबंधित पालिका प्रशासनाने यांदर्भातील माहिती एका दिवसात द्यावी. यासोबतच न्यायालयाने अग्निसुरक्षेतील नियम पालनासंदर्भात देखील स्पष्टीकरण मागवले आहे. तर या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी २७ मे ला होणार आहे. दरम्यान न्यायालयाने माहिती मागवून गुजरात सरकार आणि राज्यातील सर्व महापालिकांना चांगलीच चपराक दिल्याचे सांगितले जाते.