सुपौल जिल्ह्यासाठी पूर आता काही नवीन राहिलेला नाही. सन १९६४पासून हा शापच जणू या जिल्ह्याला लागला आहे. मुगरार, बलवा, दुमड्या, निर्मली, खुकनाह, सिवना, घूरण, घिवक, बेला यांसारखी जिल्ह्यातील जवळपास ३०० गावे कोशी नदीच्या प्रभावक्षेत्रात येतात. ही सर्व गावे दर वर्षी पुराच्या भीतीच्या छायेखाली जगत असतात. मात्र, केंद्र सरकार किंवा राज्य सरकारला त्यांचे काहीही सोयरसुतक नाही. त्यांचे साधे डोळे पुसायलाही कोणी येत नाही. देश स्वतंत्र झाला त्याचा एकीकडे आनंदोत्सव साजरा होत होता, तर बिहारमधील सहरसा, सुपौल, पूर्णिया आणि मधुबनी या जिल्ह्यांच्या वेदनांना सुरुवात झाली.
कोशी ही चीन, नेपाळ आणि भारतातून वाहणारी नदी. बिहारच्या कटिहार जिल्ह्यात ती गंगा नदीला जाऊन मिळते. प्रामुख्याने सहरसा, सुपौल आणि मधुबनी या जिल्ह्यांना त्यातही सुपौल जिल्ह्याला या नदीचा सर्वाधिक फटका बसतो. कोशी नदीमुळे इथल्या नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तत्कालीन काँग्रेस सरकारने भारत-नेपाळ सीमेवर सन १९५४मध्ये या नदीवर बांध (बॅरेज) बांधला. कोशी नदीचे वैशिष्ट्य म्हणजे तिचा प्रवाह हा एकाच दिशेने नाही. ती हवी तशी वाहते. म्हणून तिचा प्रवाह एकाच दिशेने असावा, असा विचार करून तत्कालीन सरकारने या नदीवर पहिल्यांदा बॅरेज बांधले आणि नंतर नेपाळपासून भारतात साधारण सव्वाशे किलोमीटरपर्यंत आणि १५ किलोमीटर रुंदीवर समांतर असे पूर्व आणि पश्चिमेला दोन बांध बांधले. नदीला अडवण्याचा हा प्रयत्न खरे तर अघोरी धाडस होते. कारण पावसाळ्यात नेपाळ, हिमालयाकडून वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याचा प्रवाहही कोशी नदीमध्ये मिसळत असल्याने तिला प्रचंड वेग असतो. याचा फटका सन २००८मध्ये बसला. नेपाळच्या हद्दीतील कोशी नदीवरील बांध फुटला आणि नदी सुपौल जिल्ह्यात घुसली. मोठा पूर आला. यात दोन लाख ३६ हजार ६३२ घरे वाहून गेली. हजारो लोक मरण पावले, तर ३३ लाख लोक प्रभावित झाले. यामुळे शेतीची; तसेच जीवितहानी व वित्तहानी अशी प्रचंड हानी झाली. त्या वेळी ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्यात आली होती. यानंतरही इथल्या गावांची स्थिती सुधारलेली नाही. दर वर्षी इथे पूर येतो आणि निघून जातो. त्याला इथले ग्रामस्थच तोंड देतात. कोणत्याही सरकारला या नागरिकांशी देणे-घेणे नाही.
निवडणुकीवेळीच नेत्याचा चेहरा दिसतो
शिवनारायण यादव हे निर्मली या गावचे रहिवासी ते इथे नाव चालवतात. ‘आमचं साधं म्हणणं ऐकून घेण्यासाठी इथे ना कोणी नेता, मुखिया, सरपंच ना कोणती समिती येत. संयुक्त जनता दलाचे विजेंद्र यादव हे इथले आमदार, तर ‘जेडीयु’चेच दिलेश्वर कामत हे खासदार आहेत. विजेंद्र तर गेल्या ३५ वर्षांपासून मंत्री आहेत. कोणत्याच लोकप्रतिनिधीकडून आम्हाला मदत मिळत नाही. निवडणुकीवेळीच नेत्यांचा चेहरा दिसतो,’ असे यादव सांगतात. विशेष म्हणजे, एवढे विदारक स्थिती असूनही इथले लोक या दोघांनाच निवडून देतात. यातही जातीचे राजकारण महत्त्वाचे ठरते. यंदाच्या निवडणुकीत इथे ‘जेडीयु’चे दिलेश्वर कामत विरुद्ध ‘आरजेडी’चे चंद्रहास चौपाल यांच्यात लढत आहे. चंद्रहास हरिजन समाजाचे आहेत. मागच्या वेळी दिलेश्वर दोन-अडीच लाखांच्या फरकाने जिंकून आले होते. यंदाही तेच निवडून येतील, असे इथले नागरिक सांगतात.