‘पूर्णिमाने आठ हजार ८४८.८६ मीटर उंचीचे हे शिखर १२ मे रोजी सर केले. त्यानंतर १९ मे रोजी पसंग शेर्पासोबत दुसऱ्यांदा तिने हे अत्युच्च टोक गाठले, तर शनिवारी पहाटे ५.५० वाजता तिसऱ्यांदा एव्हरेस्टला गवसणी घातली,’ असे या मोहिमेचे आयोजक पेंबा शेर्पा यांनी सांगितले. पूर्णिमाचा हा चौथा एव्हरेस्ट विजय असून, २०१८मध्ये तिने पहिल्यांदा हे शिखर सर केले होते.
‘गिर्यारोहणाच्या इतिहासात कोणत्याही गिर्यारोहकाने एकाच मोसमात तीनदा एव्हरेस्ट सर करण्याची ही पहिलीच वेळ आहे,’ असे हे शिखर सर करणाऱ्या निमा डोमा शेर्पा यांनी नमूद केले.
एव्हरेस्ट मॅरेथॉनचे छायांकन करण्यासाठी पूर्णिमा २०१७मध्ये एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचली होती. तिथूनच तिला गिर्यारोहणाबाबत आवड निर्माण झाल्याचे तिचे म्हणणे आहे. त्यानंतर तिने त्याच वर्षी माऊंट मनास्लू (८,१६३ मीटर) सर केले, तर पुढच्या वर्षी एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली. पूर्णिमाने अन्नपूर्णा, धौलागिरी, कांचनजंगा, ल्होत्से, मकालू आणि माऊंट के२ आदी शिखरेही सर केली आहेत.
एव्हरेस्ट चढाईचा ४०वा वर्धापन दिन
माऊंट एव्हरेस्टवर पोहोचणारी पहिली भारतीय महिला ठरलेल्या गिर्यारोहक बचेंद्री पाल यांनी शनिवारी बेस कॅम्पपर्यंत ट्रेकिंग करून आपल्या ऐतिहासिक मोहिमेचा ४०वा वर्धापन दिन साजरा केला. इतरांना प्रेरणा देण्याची संधी मिळाल्याचा आपल्याला आनंद असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.