हायलाइट्स:
- चालक गाडीत ठेवलेले रोख एक कोटी रुपये घेऊन पसार
- मालक लघुशंकेसाठी कारमधून उतरल्याची संधी साधली
- येरवडा पोलिसांकडून फरार चालकावर गुन्हा दाखल
पुणे : मालक लघुशंकेसाठी कारमधून उतरल्याची संधी साधून चालक गाडीत ठेवलेले रोख एक कोटी रुपये घेऊन पसार झाल्याची घटना घडली आहे. येरवड्यातील कल्याणीनगरमध्ये सोमवारी रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी फरार चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
विजय माधव हलगुंडे (वय.२२,रा.टिळेकर नगर,कात्रज कोंढवा ) असं गुन्हा दाखल झालेल्या कारचालकाचं नाव आहे. याप्रकरणी अशोक रघुवीर गोयल (वय.५०,रा.एनआयबीएम ,कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील मार्केटयार्डात फिर्यादी गोयल यांचे श्री.पंचगंगा अॅग्रो इन्पॅक्स प्रा.लि.नावाचे सुकामेवा आणि मसाल्यांचा होलसेल विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे आय २० मोटार कार असून आरोपी हलगुंडे हा गेल्या दहा महिन्यांपासून चालक म्हणून नोकरीला आहे. व्यवसायातून जमा होणारी रोख रक्कम गोयल बँकेत जमा करतात.
गेल्या महिन्याभरात व्यवसायातून जमा झालेले ९७ लाख रुपये त्यांनी स्व:ताकडे ठेवले होते. गोयल यांना मुळगावी हरियानाला जायचे असल्याने त्यांच्याकडील ९७ लाख रुपये घेऊन ते कल्याणी नगरमधील आपल्या मित्राकडे ठेवायचे होते. सोमवारी रात्री ते ९७ लाख रुपये रोख रक्कम कापडी पिशवीत भरून आय २० कारमधून कल्याणी नगरच्या दिशेने निघाले. सोमवारी रात्री मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. एचएचएसबी कंपनीजवळ गाडी आल्यावर गोयल यांनी चालक हलगुंडे याला गाडी बाजूला घेण्यास सांगून लघुशंकेसाठी खाली उतरले.
काही वेळाने गोयल माघारी परतल्यावर त्यांना रस्त्यावर गाडी दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी चालकाला मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद मिळाला नाही. गाडी उभा केलेल्या परिसरातील रस्त्यावरील वरघे सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यावर चालक गाडीतील रोख रकमेची पिशवी घेऊन पसार झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी सहायक निरीक्षक रवींद्र आळेकर अधिक तपास करत आहेत.