पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, अमेठीचे रहिवासी कमलीवाले पागल बाबा कैला देवी पोलीस स्टेशन हद्दीतील बेनीपूरमध्ये पंचग्नी तपश्चर्या करत होते. ही तपश्चर्या २३ मे ते २७ मे या कालावधीत होणार होती, त्यासाठी त्यांनी संभलचे उपविभागीय दंडाधिकारी विनय कुमार मिश्रा यांची परवानगीही घेतली होती.
रविवारी या बाबाची तब्येत अचानक बिघडली, त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ त्यांना जिल्हा रुग्णालयात नेत होते. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती विनय कुमार मिश्रा यांनी दिली. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, प्रचंड उन्ह असतानाही ते त्यांच्याभोवती होमहवन पेटवून तपश्चर्या करत होते आणि कदाचित उष्णतेमुळेच त्यांचा मृत्यू झाला असावा.
त्यांच्या अनुयायांनी सांगितले की, ते जागतिक शांतता आणि अंमली पदार्थांच्या व्यसनापासून मुक्तीसाठी समर्पित होते. संभल जिल्हा प्रशासनाने सांगितले की त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी २३ वेळा अशीच तपश्चर्या केली होती. साधूच्या कुटुंबीयांना त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली आहे, असं मिश्रा यांनी सांगितलं.
इतक्या प्रखर उन्हात कमलीवाले पागल बाबा यांना तपश्चर्या करण्याची परवानगी प्रशासनाने कशी दिली आणि परवानगी दिल्यानंतर तेथे वैद्यकीय व्यवस्था का केली नाही, असा सवाल आता ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. त्यांच्या अनुयायिंनी देखील प्रशासन आणि आरोग्य विभागावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.