हायलाइट्स:
- एकाने महिलेचा गळा चिरून केला खून
- शेतामध्ये दबा धरून बसला होता आरोपी
- पोलिसांनी लातूर जिल्ह्यात केली नाकाबंदी
लातूर : निलंगा तालुक्यातील गुऱ्हाळ गावात ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता शेतामध्ये दबा धरून बसलेल्या एकाने महिलेचा गळा चिरून खून केल्याची घटना घडली आहे. सदर महिलेने आरडाओरडा केल्याने शेजारचे शेतकरी धावत आले, मात्र तोपर्यंत मारेकरी पळून गेला.
शेषाबाई मारूती दुधभाते (वय ६५ वर्ष) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून त्या बुधवारी दुपारी आपल्या शेतात गेल्या होत्या. दुपारी ३ वाजताच्या सुमारास बाजूच्या शेतात दबा धरून बसलेल्या अज्ञात व्यक्तीने शेषाबाई यांच्या जवळ येऊन गळ्यातील सोन्याची बोरमाळ, मंगळसूत्र असे एकूण चार तोळे सोने हिसकावून घेतले. महिलेने आरडाओरडा करताच अज्ञात व्यक्तीने त्याच्या हातातील लोखंडी सुरीने महिलेचा गळा कापला आणि तो बाजूच्या तळीखेड वाटेने उसातून पळून गेला.
सदरील व्यक्तीच्या अंगावर काळी पॅन्ट व पांढरा शर्ट होता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
या प्रकरणी उपविभागीय अधिकारी दिनेशकुमार कोल्हे , पोलीस निरीक्षक बी.आर.शेजाळ यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी निलंगा येथील उपविभागीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी लातूर जिल्ह्यात नाकाबंदी केली असून या घटनेमुळे परिसरात सध्या भीतीचं वातावरण पसरलं आहे.