प्रश्न : काँग्रेसच्या तुम्ही ‘स्टार प्रचारक’ आहात. या निवडणुकीच्या निकालाबाबत तुमचा अंदाज काय आहे?
उत्तर : ही निवडणूक सर्वसामान्य मतदार लढत असून, देशातील जनतेला बदल हवा आहे.
प्रश्न : चार जूननंतर काँग्रेसमध्ये तुमची कोणती भूमिका असेल? पक्षाची मांडणी करण्यात आणि लोकांपर्यंत विचार पोहोचण्यात तुम्ही सकारात्मक भूमिका बजावता, असे एका वर्गाचे मत आहे.
उत्तर : पक्ष मला जी भूमिका देईल, ती मी पूर्ण क्षमतेने पार पाडीन, यात शंका नाही.
प्रश्न : राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर कितपत परिणाम झाला?
उत्तर : राहुल गांधींचा दौरा म्हणजे जनतेशी संपर्क साधण्याची मोठी चळवळ होती. नेत्याने लोकांमध्ये जावे, त्यांच्या समस्या समजून घ्याव्यात आणि त्या प्रश्नांचा आवाज व्हावा, असा प्रयत्न होता. त्याचबरोबर भाजपच्या फुटीरतावादी राजकारणात प्रेम, एकता आणि सलोख्याचा संदेश दिला. या यात्रेमुळे पक्षात आणि राहुल गांधीमध्ये नवी ऊर्जा संचारली. देशातील जनतेमध्ये एक प्रकारचा असंतोष होता. या यात्रेच्या माध्यमातून तो बाहेर आला. नरेंद्र मोदींच्या हुकूमशाहीने जनतेचा आवाज दाबला होता, तो आवाज आता देशभर वर येत आहे.
प्रश्न : राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपला काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न आहे. या दोन मुद्द्यांवर तुमचे काय मत आहे?
उत्तर : धर्म आणि राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर मला भाजपला प्रतिवाद करायचा नाही. माझ्या कुटुंबातील सदस्यांनी या देशासाठी आपले रक्त सांडले आहे. भाजप नेत्यांकडून देशभक्तीच्या प्रमाणपत्राची गरज नाही. नेत्याचे कर्तव्य म्हणजे जनतेची सेवा करणे. आम्ही आयुष्यभर या धर्माचे पालन करू.
प्रश्न : ‘इंडिया’ आघाडीमध्ये नेतृत्वाबाबत संभ्रम असल्याचे बोलले जात होते. याकडे तुम्ही कसे पाहता.
उत्तर : ‘इंडिया’ आघाडीतील अंतर्गत सामंजस्य खूप चांगले आहे. सर्वांच्या संमतीने सर्व काही ठरवले जात आहे. सगळीकडे सर्वच पक्षांनी एकजूट दाखवली आहे. कार्यकर्तेही एक होऊन काम करीत आहेत.
प्रश्न : कमकुवत संवाद पद्धतीमुळे काँग्रेस आपले म्हणणे जनतेपर्यंत पोहोचवू शकत नाही, अशी चर्चा आहे. यावेळी काँग्रेसची आश्वासने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणती रणनीती आखली?
उत्तर : यंदा आम्ही जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले आहे. महिला महागाईने त्रस्त आहेत. गरीब कुटुंबातील महिलेला दरमहा ८ हजार ५०० रुपये मिळतील, दहा किलो रेशन मिळेल, २५ लाखांपर्यंत आरोग्य विमा मिळेल आणि शैक्षणिक कर्ज माफ होईल, अशी आश्वासने आम्ही दिली आहेत.
प्रश्न : विरोधी पक्षांमध्ये तुमची वैयक्तिक ‘केमिस्ट्री’ कोणासोबत सर्वांत चांगली असते?
उत्तर : सर्वांसोबतच चांगले संबंध आहेत. ममता दीदींसोबत अधिक आत्मीयतेचे नाते आहे. लालूप्रसाद यादव यांच्यासोबतही अनेक वर्षांपासून माझे नाते चांगले आहे. त्यांचा मी आदर करते.