बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर इंडिगोच्या टीमने अलर्ट जारी केला आणि प्रवाशांना विमानातून उतरण्याची विनंती केली. काही प्रवाशांनी आपात्कालीन गेटवरून तर काहींनी विमानाच्या मुख्य गेटवरून खाली उड्या मारायला सुरुवात केली. त्यामुळे मोठा गोंधळ झाला होता. दिल्ली अग्निशमन दलाच्या जवानाने सांगितले की, सकाळी ५ वाजून ३० मिनिटाला आम्हाला दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगो विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. आमची क्विक रिस्पॉन्स टीम घटनास्थळी पोहोचली. विमानाच्या आपत्कालीन गेटमधून सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान, काही प्रवासी घाबरले आणि त्यांनी विमानातून खाली उड्या मारायला सुरुवात केली. आता सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
विमानतळाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, एव्हिएशन सिक्युरिटी, डॉग स्क्वॉड आणि बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडचे पथक घटनास्थळी पोहोचले आहेत आणि त्यांनी विमानाची बारकाईने पाहणी केली. विमानाला चाचणीसाठी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आयसोलेशन बेमध्ये नेण्यात आले आहे.
विमानाची पाहणी करण्यासाठी त्याला विमानतळाच्या एका रिकाम्या भागात नेण्यात आले आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या विमान सुरक्षा अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, टेक ऑफ करण्यापूर्वी दिल्ली-वाराणसी इंडिगो विमानाच्या टीमला विमानाच्या टॉयलेटमध्ये ‘बॉम्ब’ लिहिलेली एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीची दखल घेत टीमने आयजीआय विमानतळ प्रशासनाला अलर्ट केले आणि प्रवाशांला विमानातून खाली उतरवले.
इंडिगोने सांगितले की, सध्या विमानाची तपासणी केली जात आहे. सर्व सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्यानंतर, विमान पुन्हा टर्मिनल परिसरात आणले जाईल. सीआयएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘दिल्ली विमानतळावरील दिल्लीहून वाराणसीकडे जाणाऱ्या इंडिगो विमान 6E2211च्या दिल्ली विमानतळावरील टॉयलेटमध्ये बॉम्ब लिहिलेला टिश्यू पेपर सापडला होता, त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी त्याची तपासणी केली. मात्र ही अफवा असल्याचे निष्पन्न झाले असून खळबळ उडविण्याच्या उद्देशाने कोणीतरी हे कृत्य केले आहे.’