मंदिरांची दारे आज उघडणार; दर्शनाला जाण्यापू्र्वी ‘हे’ नियम लक्षात असू द्या

म. टा. प्रतिनिधी, मुंबईः दुसऱ्या लॉकडाउनपासून बंद झालेली मंदिरे आणि प्रार्थनास्थळे आज, गुरुवारी नवरात्रीच्या मुहूर्तावर पुन्हा सामान्य नागरिकांसाठी खुली होत आहेत. सणाच्या दिवशी तरी मंदिरात जाऊन दर्शन घेता यावे यासाठी भाविक आतुर झाले होते. मात्र हे दर्शन करोनासंबंधी नियम पाळून घेता येणार आहे. त्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे मुंबई महापालिकेने जारी केली आहेत.

महापालिकेच्या नियमावलीनुसार, धार्मिक स्थळांवर एकूण क्षमतेच्या फक्त ५० टक्के उपस्थितीला परवानगी आहे. तसेच, निर्जंतुकीकरण, मास्कचा वापर, सुरक्षित अंतराचे नियम बंधनकारक राहणार आहेत. मंदिरात जाताना मास्क लावणे अत्यावश्यक असून निर्जंतुकीकरण, थर्मल चेकिंग या नियमांचे पालन करणेही महत्त्वाचे आहे. मंदिरात प्रवेश मिळाला तरी भाविकांना दुरूनच दर्शन घ्यावे लागणार आहे. तीर्थ-प्रसाद यांचे वाटप करू नये, प्रतिबंधात्मक क्षेत्र नसलेल्या ठिकाणीच धार्मिक स्थळी दर्शनासाठी जाता येईल, दोन व्यक्तींमध्ये सहा फुटांचे सुरक्षित अंतर आवश्यक आहे, लक्षणे असलेल्यांनी मंदिरात जाऊ नये, मूर्ती किंवा धार्मिक प्रतिकाला हात न लावता दुरूनच दर्शन घ्यावे आणि गर्दी टाळावी, अशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तसेच सहव्याधी असणारे, गरोदर स्त्रिया, १० वर्षांखालील मुले यांनी शक्यतो धार्मिक स्थळे आणि मंदिरात जाऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. धार्मिक स्थळाच्या क्षमतेनुसार प्रवेश द्यावा, परिसरातील स्टॉल, दुकानांमध्ये सुरक्षित अंतर राखावे अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

सिद्धिविनायक दर्शनासाठी ऑनलाइन आरक्षण आवश्यक

सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे गणेश दर्शनासाठी सिद्धिविनायक टेंपल अॅपद्वारे दर तासाला २५० भाविकांना आधी आरक्षण करून दर्शनासाठी जाता येईल, असे सांगण्यात आले आहे. एस. के. बोले मार्गावरील सिद्धी प्रवेशद्वारातून आणि काकासाहेब गाडगीळ मार्गावरील रिद्धी प्रवेशद्वारातून क्यूआर कोड आरक्षण केलेल्या भाविकांना प्रवेश मिळेल. ऑनलाइन आरक्षण न केलेल्यांना प्रवेश मिळणार नसल्याचे न्यासातर्फे सांगण्यात आले आहे. सकाळी ७ ते दुपारी १२ आणि दुपारी १२.३० ते सायं. ७ या वेळेत दर्शन घेता येईल. दर्शनासाठी येताना पुजेची सामग्री, प्रसाद आणू नये तसेच सामान, बॅग, लॅपटॉपही आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Source link

guidelines for religious places in maharashtraMaharashtra to reopen religious placesnavratri 2021navratri 2021 colours with date octobertemple reopen in maharashtra
Comments (0)
Add Comment