मिळालेल्या माहितीनुसार, ससूनचा हा कर्मचारी सध्या नॉट रिचेबल आहे. तो त्यात विभागात काम करतो ज्या विभागात पोर्शे अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. त्यामुळे या कर्मचाऱ्याचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एकीकडे पोलिसांकडून कुणीही बेपत्ता नसल्याचा दावा केला जात आहे. तर, दुसरीकडे पोलिसच या व्यक्तीचा शोध घेत असल्याची माहिती आहे. त्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु आहे.
पुणे पोर्शे अपघातात धक्कादायक गोष्टींची उकल
पुण्याच्या कल्याणीनगर भागात पोर्शे अपघातात अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोघांचा जीव गेला. यावेळी बिल्डर विशाल अगरवाल याचा अल्पवयीन मुलगा पोर्शे गाडी चालवत होता. त्या दारुही प्यायली होती हे पोलिसांनी जप्त केलेल्या पबच्या सीसीटीव्ही फुटेज आणि पबच्या बिलावरुन स्पष्ट झालं होतं. मात्र, ससून रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांनी त्याच्या रक्ताच्या नमुन्याची फेरफार करत त्याने दारु प्यायली नसल्याचा अहवाल दिला. पुणे पोलिसांना यावर संशय होताच, त्यामुळे त्यांनी अल्पवयीनची पुन्हा ब्लड टेस्ट केली आणि ससूनमध्ये घेतलेल्या रक्ताच्या नमुन्याशी त जुळवून पाहिले. तेव्हा ते त्याचे नसल्याचं समोर आलं आणि ससूनच्या डॉक्टरांचा पर्दाफाश झाला.
ससूनच्या डॉक्टरांकडून रक्ताच्या नमुन्यांची फेरफार
ससूनच्या डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताच्या नमुन्याशी बदलले होते. त्यासाठी त्यांना विशाल अगरवालने पैसे दिले होते. सध्या दोन्ही डॉक्टर आणि एक शिपाई पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर, आता याप्रकरणात ससूनमधील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्याने ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी एसआयची स्थापन करण्यात आली आहे. त्यासाठी या समितीच्या प्रमुख डॉ. पल्लवी सापळे या मंगळवारी रुग्णालयात पोहोचल्या असून त्या याप्रकरणी रक्तचाचणी विभागाची चौकशी करतील.
याप्रकरणात आता पुणे पोलिस रक्तचाचणी विभागातील सर्वांची चौकशी करणार असल्याचीही माहिती आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याचं पुणे गुन्हे शाखेने सांगितलं.
पुणे पोर्शे ड्रिंक अँड रॅश ड्रायव्हिंग प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे. सुरुवातीला फक्त एका श्रीमंत घरच्या बिघडलेल्या लाडोबाचं वाटणारं हे प्रकरण आता हळूहळू पुण्यातील शासकीय यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेची पोलखोल करत आहे.