पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींविषयी संशय उपस्थित केल्याचे सांगत, मोदी यांनी बॅनर्जी यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ‘बॅनर्जी यांच्या या प्रतिकूल शेऱ्यानंतर आता तृणमूल काँग्रेस आपल्या गुंडांना या न्यायाधीशांवर सोडणार का,’ असा प्रश्न मोदी यांनी केला.
पश्चिम बंगालमध्ये अनेक जमातींना २०१०पासून दिलेला ‘ओबीसी’ दर्जा कोलकाता उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात रद्द केला होता. राज्यात नोकऱ्या आणि पदांसाठी हे आरक्षण देणे बेकायदा असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. त्यावर, न्यायालयाने हा आदेश भाजपच्या प्रभावाखाली दिल्याचा आरोप करत, आपण हा आदेश स्वीकारणार नाही, अशी ताठर भूमिका ममता यांनी मांडली होती.
‘तृणमूल काँग्रेसला त्यांचा विश्वासघात आणि खोटेपणा उघड करणारे लोक आवडत नाहीत, हे स्पष्ट आहे. हा पक्ष न्यायव्यवस्थेवर ज्या पद्धतीने प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे, हे पाहून मी थक्क झालो. त्यांचा न्यायव्यवस्था आणि राज्यघटनेवर विश्वास नाही का? त्यांनी न्यायाधीशांवर टीकास्त्रभ सोडणे हे अभूतपूर्व आहे. तृणमूल काँग्रेस आता न्यायाधीशांवर त्यांचे गुंड धाडणार का?’ असा घणाघात मोदी यांनी केला.
रामकृष्ण मिशन आणि भारत सेवाश्रम संघाच्या काही साधूंविरोधात ममता यांनी अलिकडेच केलेल्या काही टिप्पण्यांवरही पंतप्रधानांनी संताप व्यक्त केला. ‘तृणमूलच्या मतपेढीला संपुष्ट करण्यासाठी या सामाजिक, धार्मिक संघटनांना धमक्या दिल्या जात आहेत’, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.