वृत्तसंस्था, नवी दिल्ली : ‘लिव्ह-इन पार्टनर’ श्रद्धा वालकर हिची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपी आफताब अमीन पूनावाला याच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये आणखी डिजिटल व फॉरेन्सिक पुरावे जोडण्यात आले असल्याचे न्यायालयातील सूत्रांनी मंगळवारी सांगितले.
मे २०२२मध्ये राजधानीतील मेहरौली येथे श्रद्धाचा गळा दाबून हत्या केल्याचा व तिच्या शरीराचे तुकडे करून ते शहराच्या वेगवेगळ्या भागांत फेकून दिल्याचा पूनावालावर आरोप आहे. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या ३०२ (हत्या) आणि २०१ (पुरावे नष्ट करणे) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूनावालाविरोधात शहर न्यायदंडाधिकारी अविरल शुक्ला यांच्यापुढे सुमारे तीन हजार पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने गुगल लोकेशन्स, सर्च हिस्ट्री आणि इतर डिजिटल आणि फॉरेन्सिक पुराव्यांचा समावेश आहे. या पुराव्यांतून पूनावालावरील आरोपांची अधिक स्पष्टतेने पुष्टी होते, असा दावा शहर पोलिसांनी केला आहे. याआधी मागील वर्षी ऽजानेवारी महिन्यात पूनावालाविरोधात सहा हजार ६२९ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.