इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाती उघडण्यासाठी महिलांची पोस्ट ऑफिसबाहेर झुंबड उडाली. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला विजय मिळाल्यास, केंद्रात त्यांची सत्ता आल्यास आपल्या खात्यात दर महिन्याला ८५०० रुपये जमा होतील, अशी आशा महिलांना आहे. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातलं मतदान १ जूनला होईल. ४ जूनला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.
पोस्टत खातं उघडल्यापासून पैसे येण्यास सुरुवात होईल, असं परिसरातील प्रत्येक जण सांगत असल्यानं पोस्टात आल्याचं अनेक महिलांनी सांगितलं. पोस्टाबाहेर गर्दी करणाऱ्या बहुतांश महिला शिवाजीनगर,चामराजपेठ आणि आसपासच्या भागातील होत्या. महिलांची संख्या अधिक असल्यानं मोकळ्या जागेही काऊंटर्स उघडली गेली.
पोस्ट खात्यात महिन्याकाठी ८५०० रुपये जमा होणार असल्याची अफवा काँग्रेसच्या काही आमदारांनी पसरवल्याचं समजतं. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून पोस्ट कार्यालयांबाहेर गर्दी पाहायला मिळत आहे. इंडिया आघाडीची सत्ता आल्यावर ४ जूननंतर आपल्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल, अशी आशा महिलांना आहे.
केंद्रात सत्ता आल्यास महालक्ष्मी योजना राबवण्याचं आश्वासन काँग्रेसनं दिलं आहे. या योजनेच्या अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंब प्रमुखांच्या खात्यात दरमहा ८५०० रुपये थेट जमा केले जातील, असं आश्वासन काँग्रेसनं जाहीरनाम्याच्या माध्यमातून दिलं आहे. सत्ता आल्यावर तुमच्या खात्यात खटाखट खटाखट पैसे जमा करु, असं राहुल गांधी एका सभेत म्हणाले होते. त्यांचा व्हिडीओ व्हायरलही झाला होता.