पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, येथे सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तिरुनेलवेल्लीचे पोलिस महानिरीक्षक प्रवेशकुमार, पोलिस अधीक्षक ई. सुंदरावथनम यांनी रॉक मेमोरियल, जेट्टी, हेलिपॅड; तसेच कन्याकुमारी येथील सरकारी अतिथिगृहाची पाहणी केली. पंतप्रधानांचे सुरक्षा पथक याआधीच येथे दाखल झाले आहे. हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरवण्याचीही चाचणी करण्यात आली आहे. सागरी सुरक्षा चोख ठेवण्यात आली आहे. तटरक्षक दल आणि नौदलातर्फे सागरी सीमांवर गस्त घातली जाईल. या कालावधीत विवेकानंद स्मारक व तिरूवल्लुवर स्मारकाचे परिसर पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या तीन समुद्रांचा संगम असलेले कन्याकुमारी हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. पंतप्रधानांनी तमिळनाडूला यावर्षी अनेकदा भेट दिली असून धनुष्कोडीसारख्या तीर्थक्षेत्रालाही त्यांनी भेट दिली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या व अखेरच्या टप्प्याचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारपासून (३० मे) दोन दिवस तमिळनाडूतील कन्याकुमारीजवळ समुद्रातील विवेकानंद स्मारक परिसरात ध्यानमग्न होणार आहेत. त्यांची ही प्रस्तावित ध्यानधारणा सुरू होण्यापूर्वीच विरोधकांच्या टीकेचा विषय बनली आहे. ‘मोदीजी, या वेळी कॅमेरा बरोबर न घेता ध्यानाला जा’ असा टोला राष्ट्रीय जनता दलाने लगावला, तर काँग्रेसने याची संभावना नाटकबाजी अशी केली.
‘मोदी प्रायश्चित्त घेत असतील, तर चांगलेच आहे’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कन्याकुमारी येथील ध्यानधारणेच्या कार्यक्रमावर विरोधी नेत्यांनी मात्र टीकास्त्र सोडले आहे. ‘ज्या व्यक्तीला विवेक या शब्दाचा अर्थ समजत नाही, ते ध्यान काय करणार? जर ते प्रायश्चित्त घेणार असतील, तर चांगले आहे. किंवा ते स्वामी विवेकानंद यांच्या लेखनातून प्रेरणा घेणार असतील, तरीही चांगले आहे,’ अशी टीका राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी केली.