या २५ वर्षीय महिलेला आपल्या गरोदरपणात केस खाण्याचे विचित्र व्यसन लागले होते. ही महिला आपल्या केसांसोबतच तिच्या आजूबाजूला असणारे केस देखील खाऊन टाकत होती. यादरम्यान तिला मात्र काहीच त्रास जाणवला नाही. बाळाला जन्म देताच तिने केस खाणं देखील सोडलं होतं. पण काहीच दिवसांत तिच्या पोटाला त्रास होऊ लागला. यामध्ये तिला खाता न येणे, पोटात दुखणे तसेच उलट्या होणे अशी लक्षणं जाणवू लागली.
या परिणामाने त्रस्त झाल्याने महिलेला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तिथे केलेल्या उपचाराचा तिच्यावर काहीच फरक पडला नाही. यानंतर तिला चित्रकूटच्या एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी तिला तपासल्यावर पोटदुखीचे धक्कादायक कारण समोर आले. ते म्हणजे, तिच्या पोटात केसाचा गुंता तयार झाला होता.
कारण समजताच डॉक्टरांनी तातडीने तिच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली. सुमारे ४५ मिनिटे चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या पोटातून सुमारे अडीच किलो वजनाचा केसांचा गुच्छा काढण्यात आला.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या महिलेला ट्रायकोफॅगिया नावाच्या दुर्मिळ आजाराने ग्रासले होते. ज्यामध्ये आजाराने ग्रस्त लोक आपलेच केस वारंवार खातात, चोखतात आणि चघळतात सुद्धा. या स्थितीचा आरोग्यावर दिर्घकालीन परिणाम होऊ शकतो ज्यामध्ये कुपोषण आणि पचनसंस्थेत अडथळे येऊन मृत्यूची शक्यता देखील नाकारता येत नाही.