लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना खर्गे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. ‘सध्याच्या सरकारला आणखी एक संधी मिळाली, तर देशातील लोकशाहीच संपुष्टात येईल,’ या आपल्या मताला लोकांनी दुजोरा दिला आहे, असे खर्गे म्हणाले.
रिचर्ड अॅटनबरो यांच्या ‘गांधी’ या चित्रपटानंतर जगाला महात्मा गांधी यांच्याविषयी माहिती मिळाली, या पंतप्रधान मोदी यांच्या विधानावरूनही खर्गे यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. ‘नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘गांधी’ चित्रपट पाहिल्यानंतर त्यांना महात्मा गांधी यांच्याविषयी माहिती मिळाली. हे हास्यास्पद आहे. कदाचित मोदींनी गांधीजींबद्दल कधीच वाचलेले नसावे. सगळ्या जगाला महात्मा गांधी माहिती आहेत, संयुक्त राष्ट्रांसह विविध ठिकाणी त्यांचे पुतळे आहेत. मोदींनी गांधीजींबद्दल काही माहिती नसेल, तर त्यांना राज्यघटनेविषयीदेखील काहीही माहिती नसेल. ४ जूननंतर मोदींना खूप वेळ असेल, त्यावेळी त्यांनी महात्मा गांधींबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे आत्मचरित्र वाचावे,’ असा टोला खर्गे यांनी मारला.
मोदींकडून ४२१ वेळा मंदिर-मशिद
निवडणूक आयोगाने जात आणि धर्म या मुद्द्यांवरून मतदारांना आवाहन न करण्याचे निर्देश दिसे असतानाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान ‘मंदिर-मशिद’ आणि भेदभाव करणाऱ्या मुद्द्यांचा ४२१ वेळा उल्लेख केला, असेही खर्गे यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी मागील १५ दिवसांत केलेल्या भाषणात २३२ वेळा काँग्रेसचे नाव घेतले, तर ७५८वेळा स्वत:चे नाव घेतले. त्यांनी एकदाही बेरोजगारीच्या मुद्द्याचा उल्लेख केला नाही, असे खर्गे म्हणाले.
कृषीकर्ज माफ करू : राहुल
बालासोर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अग्निवीर योजनेद्वारे जवानांना मजूर बनवले आहे, असा आरोप करत ही योजना रद्द करण्याचे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी दिले. भगवान जगन्नाथ हे मोदींचे भक्त असल्याचा दावा करून भाजपने ओडिशातील लोकांचा अपमान केला आहे, असे टीकास्त्रही राहुल यांनी ओडिशातील भद्रक मतदारसंघातील सिमुलिया येथील प्रचारसभेत बोलताना सोडले. ‘इंडिया’चे सरकार शेतीमालाला किमान आधारभूत किंमत देणारा कायदा करेल, तसेच कृषीकर्ज माफ करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
‘४८ तासांत पंतप्रधान निवडू’नवी दिल्ली : ‘इंडिया’ला लोकसभा निवडणुकीत निर्णायक बहुमत मिळेल, असा दावा करताना आघाडी ४८ तासांत पंतप्रधान पदावरील नेत्याची निवड करेल, असे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी गुरुवारी सांगितले. आघाडीत ज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील, तो पक्ष नेतृत्वाचा ‘नैसर्गिक दावेदार’ असेल, असेही रमेश यांनी स्पष्ट केले.