पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील चौकी चोरा पट्ट्यातील तुंगी-मोड येथे हा अपघात झाला असून, ७५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी सुमारे १५० फूट खोल दरीत कोसळली. ही बस हरयाणातील कुरुक्षेत्र येथून भाविकांना घेऊन जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील पौनी भागातील शिवखोरीकडे जात होती. अपघातातील मृतदेह अखनूर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून, जखमींना जम्मूतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये २५ महिला, २० पुरुष आणि १२ लहान मुलांचा समावेश आहे.
अपघात कशामुळे?
जखमी प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक वळण घेत असताना समोरून एक कार भरधाव आली. त्या कारला चुकविण्याच्या प्रयत्नात बस दरीमध्ये कोसळली.
असे झाले बचावकार्य
बस दरीत कोसळल्याने मृतदेह आणि जखमी प्रवाशांना बाहेर काढण्याचे मोठे आव्हान पोलिस आणि लष्करापुढे होते. लष्कर, पोलिस आणि स्थानिकांनी दोरीचा वापर करून मानवी साखळी बनवून मृतदेह आणि जखमींना वर काढले. लष्कराने क्रेनचा वापर करून बस दरीतून बाहेर काढली असून, रात्री उशिरापर्यंत हे बचावकार्य सुरू होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.