हायलाइट्स:
- दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नीचा शिवसेनेत प्रवेश
- उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत झाल्या दाखल
- दादरा नगर हवेली मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणार
मुंबई : दादरा नगर हवेली येथील दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी मुलगा अभिनव डेलकर यांच्यासह शिवसेनेत प्रवेश (Mohan Delkar’s Wife Joins Shivsena) केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत डेलकर यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला.
कलाबेन डेलकर या पती मोहन डेलकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर मैदानात उतरणार आहेत. दादरा नगर हवेली या जागेच्या पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकर या शिवसेनेच्या उमेदवार असतील, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
कोण होते मोहन डेलकर?
मोहन डेलकर हे दादरा नगर हवेली मतदारसंघातून सात वेळा विजयी होऊन लोकसभेत गेले होते. काही महिन्यांपूर्वी मोहन डेलकर यांनी मुंबईतील एका हॉटेलमध्ये सुसाईट नोट लिहून आत्महत्या केली. एका ज्येष्ठ खासदाराच्या आत्महत्येनं देशभरातच खळबळ उडाली होती. डेलकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत काही राजकीय नेत्यांची नावे असल्याचाही दावा करण्यात येत होता.
दरम्यान, डेलकर कुटुंबाने आपल्या पक्षात प्रवेश करावा यासाठी शिवसेनेसोबतच राष्ट्रवादी आणि भाजप या पक्षांकडून प्रयत्न सुरू होते, अशी माहिती आहे. मात्र पोटनिवडणुकीपूर्वी या कुटुंबाला पक्षात खेचण्यात शिवसेनेला यश आलं आहे. कलाबेन डेलकर या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार असणार आहेत. त्यामुळे आता भाजप आणि अन्य पक्षांकडून या निवडणुकीत कोणाला उमेदवारी दिली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.