महिलेची आपात्कालीन स्थिती पाहत डॉक्टरांची बसमध्येच धाव
सेरेना केरळ राज्य परिवहनाच्या बसने थॉटिलपलम जिल्ह्यातून अंगमालीला जात होती. प्रवासादरम्यान तिला प्रसूती वेदना जाणवू लागल्या. नंतर तिला या वेदना असह्य होऊ लागल्या. तिची अशी अवस्था पाहता बस चालकाने थेट त्रिशूरचे अमाला हॉस्पिटल गाठले. महिलेची आपात्कालीन स्थिती लक्षात घेता तिला बाहेर काढता येणे अशक्य असल्याची बाब डॉक्टर आणि परिचारिकांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी बसमध्येच धाव घेत महिलेची प्रसूती केली.
आई आणि बाळ दोघेही सुखरुप असून बाळाला एनआयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर आई आणि बाळाला डॉक्टरांच्या निगराणीत पुढील उपचार देण्यात येणार आहेत.
डॉक्टर म्हणतात, आमच्यासाठी नाविन्याचा प्रसंग
दरम्यान डॉक्टरांनी या प्रसंगाची माहिती देत सांगितले की, महिलेला प्रसूती वेदनांची सुरुवात आधीच झाली होती. त्यावेळी, तिला आपत्कालीन विभागात हलवणे आमच्यासाठी अशक्य होते. काहीच पर्याय नसल्याने आम्हाला महिलेची प्रसूती बसमध्येच करावी लागली आणि तिथेच नाळ कापावी लागली. बाळ आणि आई दोघेही सुखरुप आहेत याची आम्ही खात्री केली. सध्या दोघेही चांगल्या स्थितीत आहेत. तो दिवस आमच्यासाठी काही वेगळा आणि नाविन्याचा होता.