‘रेमल’ चक्रीवादळानंतर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवाह सुरळीत होत असल्याने मान्सूनच्या केरळमधील आगमनासाठी ही पोषक स्थिती असल्याचे हवामान विभागाने सांगितले होते. यासोबतच देशातील इतर काही भागांत देखील ३१ तारखेला मान्सूनचे आगमन होण्याचे संकेत होते. ‘पश्चिम बंगाल आणि बांगलादेशातून गेलेल्या रेमल चक्रीवादळाने मान्सूनचा प्रवाह बंगालच्या उपसागराकडे खेचला गेला त्यामुळे ईशान्येत मान्सून लवकर दाखल होईल’ असे कारण हवामान विभागाने देखील स्पष्ट केले होते.
या धर्तीवर मान्सून अंदाजित वेळेच्या आधी दाखल झाला आहे. तळपत्या उन्हामुळे संपूर्ण देशाला मान्सूनच्या आगमनाची मोठी प्रतीक्षा देखील आहे. तर जाणून घेऊया की, पावसाचे ढग कुठे आणि केव्हा दाटून येणार आहेत?
१० किंवा ११ जूनच्या आसपास मुंबईत मान्सूनचा पाऊस बरसणार असल्याचा अंदाज आहे. याचवेळी २७ जूनपर्यंत मान्सून राजधानी दिल्लीत दाखल होईल. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दिल्लीत कडाक्याच्या उन्हात बुधवारी हलका पाऊस देखील झाला. त्यानंतर शहरात देशातील सर्वाधिक ५२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बुधवारी दुपारी अडीच वाजता दिल्लीतील मुंगेशपूर येथील हवामान केंद्रात ५२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
पश्चिम बंगाल सध्या रेमल चक्रीवादळाच्या प्रभावातून सावरत आहे. तर येथे १० ते २९ जून दरम्यान मान्सून अपेक्षित आहे. १३ किंवा १५ जूनपर्यंत मान्सून बेंगळुरूमध्ये पोहोचेल, असा अंदाज आहे. १८ ते २० जूनदरम्यान उत्तर प्रदेशात मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यातच, बिहारमध्ये १३ ते १८ जून दरम्यान मान्सूनचा पाऊस अपेक्षित असल्याचे देखील हवामान विभागाने सांगितले.