लोकसभा निवडणुकीत मतदान झाल्यानंतर एक्सिट पोल जाहीर करता येतो. एक्झिट पोलमध्ये देशातील विविध मतदारसंघात कोणता उमेदवार निवडूण येणार याचा अंदाज व्यक्त केला जातो. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शेवटचे मतदान झाल्यानंतर ३० मिनिटानंतर एक्झिट पोल जाहीर करता येतात.
एक्झिट पोलमध्ये मतदान करून आलेल्या मतदारांना कोणाला मत दिले हे विचारले जाते आणि त्यानुसार संबंधित मतदारसंघातून कोण विजयी होणार याचा अंदाज व्यक्त केला जातो. सर्वेक्षण करणाऱ्या संस्था मतदानानंतर मतदारांचा अभिप्राय विचारतात आणि त्यानंतर या डेटाचा वापर करून निकालांचा अंदाज लावतात. २०२४च्या निवडणुकीत एकूण ८ हजार ३६० उमेदवार रिंगणात आहेत.
लोकसभा २०२४साठीचे एक्झिट पोल १ जून २०२४ रोजी संध्याकाळी ६.३० नंतर जाहीर करण्यास सुरुवात होतील.
कोठे पाहू शकता लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल
लोकसभा निवडणूक २०२४चे एक्सिट पोल तुम्ही महाराष्ट्र टाइम्सच्या वेबसाइटवर लाइव्ह पाहू शकता. विविध वृत्तवाहिन्या आणि संस्था या एक्झिट पोलचे प्रसारण करतील.
एक्झिट पोलचा इतिहास
सर्वात पहिले एक्झिट पोल अमेरिकेत झाले होते. १९३६ साली जॉर्ज गैलप आणि क्लॉड रोबिंसन यांनी न्यूयॉर्क शहरात एक निवडणुकीचे सर्वेक्षण केले. भारतात एक्झिट पोलची सुरुवात १९९६ मध्ये झाली. सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेवलपिंग सोसायटीज (CSDS) या संस्थेने देशात पहिला एक्झिट पोलचा सर्व्हे केला होता. या एक्झिट पोलमध्ये निष्कर्ष काढण्यात आला होता की, भारतीय जनता पार्टी लोकसभेची निवडणूक जिंकणार. प्रत्यक्षात भारतीय जनता पार्टीने निवडणूक जिंकली तेव्हापासून भारतात एक्झिट पोलला चालना मिळाली.