Prajwal Revanna: अखेर प्रज्वल रेवण्णाला बेड्या; जर्मनीहून परतताच एसआयटीने केली अटक, ६ जूनपर्यंत कोठडी

वृत्तसंस्था, बेंगळुरू : अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले जनता दल (सेक्युलर) पक्षाचे निलंबित खासदार प्रज्वल रेवण्णा हे शुक्रवारी जर्मनीहून परतताच विशेष तपास पथकाने (एसआयटी) त्यांना विमानतळावरच अटक केली. बेंगळुरू न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सहा जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

माजी पंतप्रधान आणि जेडीएस पक्षाचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांचे नातू असलेले प्रज्वल रेवण्णा हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) कर्नाटकातील हासन लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आहेत. मतदानानंतर या मतदारसंघात व्हायरल झालेल्या लैंगिक शोषणाच्या व्हिडिओंच्या पार्श्वभूमीवर त्यांनी देश सोडला आणि एक महिन्यांहून जास्त काळ ते जर्मनीमध्ये राहत होते. अनेक समन्स चुकविल्यानंतर अखेर गुरुवारी मध्यरात्रीनंतर ते जर्मनीहून भारतात परतले. बेंगळुरू विमानतळावर उतरताच एसआयटीच्या पथकाने त्यांना अटक केली आणि चौकशीसाठी घेऊन गेले.

‘प्रज्वल हे मध्यरात्री १२.४० ते १२.५०च्या दरम्यान विमानतळावर उतरले. त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट असल्याने ‘एसआयटी’ने त्यांना अटक करून ताब्यात घेतले. आता त्यांच्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल,’ असे कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी शुक्रवारी सांगितले.

प्रज्वल हे ‘एसआयटी’ तपासात पूर्ण सहकार्य करीत असल्याचे त्यांचे वकील अरुण जी. यांनी सांगितले. ‘मी त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोललो. तपासात सहकार्य करण्यासाठीच ते पुढे आले असल्याचा निरोप त्यांनी प्रसारमाध्यमांना दिला आहे. त्यामुळे मीडिया ट्रायल होऊ नये, अशी विनंतीही त्यांनी केली आहे,’ असे अरुण यांनी सांगितले.

प्रज्वल यांच्यावर आत्तापर्यंत लैंगिक अत्याचाराचे तीन गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर बलात्काराचेही आरोप आहेत. २८ एप्रिल रोजी हासनमधील होलेनरसीपुरा टाउन पोलिस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात दाखल झालेल्या पहिल्या गुन्ह्यात ४७ वर्षीय माजी मोलकरणीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. ते आरोपी क्रमांक दोन म्हणून सूचीबद्ध असून, त्यांचे वडील आणि होलेनरसीपुराचे आमदार एच. डी. रेवण्णा हे आरोपी क्रमांक एक आहेत.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात मोठी कारवाई; आणखी एकजण अटकेत, कोण आहे ही व्यक्ती?
आईची चौकशी होणार
के. आर. नगर येथून एका महिलेचे अपहरण केल्याप्रकरणी प्रज्वल यांची आई भवानी रेवण्णा यांचीही चौकशी केली जाणार आहे. ‘एसआयटी’ निरीक्षक आणि तपास अधिकारी हेमंतकुमार एम. यांनी ही माहिती दिली. भवानी यांनी १ जून रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या कालावधीत चेन्नंबिका निलय या त्यांच्या निवासस्थानीच उपस्थित राहावे, अशी सूचना ‘एसआयटी’ने त्यांना केली आहे.

कारवाईसाठी महिला पथक
प्रज्वल यांचे विमानतळावर ‘एसआयटी’च्या महिला पथकाने ‘स्वागत’ केले. त्यांना अटक करण्याची कारवाई सुमन डी. पेन्नेकर आणि सीमा लाटकर या दोन महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील महिला पोलिसांनी केली. त्यानंतर महिला पोलिसांनीच प्रज्वल यांना जीपमधून सीआयडी कार्यालयात आणि त्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले. महिला कोणालाही घाबरत नाहीत, हा प्रतिकात्मक संदेश प्रज्वल यांना देण्यासाठीच ‘एसआयटी’ने महिला पथक नेमले होते, असे सूत्रांनी सांगितले.

Source link

Karnataka PoliceNDAprajwal revannaprajwal revanna arrestedprajwal revanna video caseSIT
Comments (0)
Add Comment