बिहारमध्ये रोहतास येथे तीन निवडणूक कर्मचाऱ्यांचा मत्यू झाला, तर कैमूर आणि औरंगाबाद जिल्ह्यात प्रत्येकी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू ओढवला. राज्याच्या विविध भागांत आणखी चार जणांचा मृत्यू झाला. मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने राज्यभर उन्हाचा तडाखा जाणवत आहे. गुरुवारी बक्सर येथे ४७.१ अंश सेल्सिअस तापमान होते. उष्णतेची तीव्र लाट असल्याने सर्व शाळा, शैक्षणिक संस्था आणि अंगणवादी केंद्रे ८ जूनपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे मृत्युमुखी पडलेल्या १३ निवडणूक कर्मचाऱ्यांमध्ये सात होमगार्ड जवान, तीन स्वच्छता कर्मचारी व मुख्य वैद्यकीय अधिकारी कार्यालयातील एका लिपिकाचा समावेश आहे. एक चकबंदी अधिकारी (एकत्रीकरण अधिकारी), गृहरक्षक दलातील एक शिपाई यांचाही मृत्यू झाला.
यांत्रिक बिघाडामुळे पारा ५६ अंश
नागपूर : शहरातील एका स्वयंचलित हवामान केंद्रातील पारा गुरुवारी ५६ अंशांवर पोहोचल्याने नागपूर शहरात एकच खळबळ उडाली. या केंद्रावरील यंत्रात बिघाड झाल्याची प्रचंड शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने सोनेगाव परिसरात घेतलेली नोंदच (४४ अंश) अधिकृत असल्याचे प्रादेशिक हवामान केंद्राने कळविले आहे.