अशक्यतेची कला (आर्ट ऑफ द इम्पॉसिबल) असे सांगितले जाणाऱ्या राजकारणाच्या महासागरात निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात आरोप-प्रत्यारोपांच्या उंचउंच लाटांचे नर्तन सुरू आहे. निवडणुकीनंतर खर्गे यांची काँग्रेस अध्यक्षपदाची ‘नोकरी’ जाणार, अशी टीका प्रचारादरम्यान करण्यात आली होती. प्रत्यक्षात निवडणुकीचा अध्याय अखेरच्या टप्प्यात आलेला असताना डावे पक्ष व काँग्रेससह ‘इंडिया’च्या साऱ्या नेत्यांमध्ये ‘सत्तावापसी’चा विश्वास व्यक्त होत आहे. तसे झाले नाही तरी निवडणुकीनंतर ‘इंडिया’चे नेतृत्व अनुभवी खर्गे यांच्याकडे जाणार याबाबतही राजकीय जाणकारांना शंका नाही.
निवडणूक प्रचाराच्या ७७ दिवसांत काँग्रेसने मोदी व भाजप नेत्यांविरुद्ध निवडणूक आयोगाकडे ११७ तक्रारी केल्या. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. काँग्रेसने गेल्या ७२ दिवसांत नरेंद्र मोदींना २७२ प्रश्न विचारले होते; पण आम्हाला एकही उत्तर मिळाले नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे.
इतिहासात देशाला अनेकदा क्रांतीचा नवमार्ग दाखवणाऱ्या महाराष्ट्रासह कर्नाटक व बिहार या तीनच राज्यांत भाजपच्या जागा सध्याच्या अंदाजानुसार कमी झाल्या तरी जाणकारांच्या मते मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला तिसऱ्यांदा २७२चा जादुई आकडा गाठता येण्याची शक्यता अंधुक आहे. त्यामुळेच ‘इंडिया’चे नेतृत्व; तसेच संभाव्य पंतप्रधानपदाचा सर्वमान्य चेहरा म्हणून खर्गे यांच्या नावाचाच पर्याय पुढे आला आहे. आघाडीला बहुमत मिळाले तरी राहुल गांधी पंतप्रधानपदाची जबाबदारी घेणार नाहीत, असे काँग्रेसचे नेते आताच ठामपणे सांगत आहेत. काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्यास पंतप्रधानपदावर त्याच पक्षाचा नैसर्गिक दावा असेल. या स्थितीत ‘इंडिया’तील तमाम नेत्यांना मान्य होईल असे खर्गे यांचेच नाव आहे.
सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध
५० वर्षांची राजकीय कारकीर्द असलेले खर्गे यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध आहेत. ‘एनडीए’साठी निकाल विपरित लागले, तर नवीन पटनाईक व भाजपला पुन्हा टाटा करू शकतील असे नितीशकुमार यांच्याशीही त्यांचे उत्तम ‘ट्युनिंग’ आहे. ‘इंडिया’तील ज्या ज्येष्ठ नेत्यांना राहुल यांच्याशी बोलणेदेखील मान्य नाही, त्यांच्याकडूनही लोकसभा निकालांनंतर आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी खर्गे यांच्याच नावाला पसंती मिळू शकते.
सोनियांकडून सूतोवाच
खर्गे यांच्या संभाव्य पंतप्रधानपदाबाबतचे सुतोवाच खुद्द सोनिया गांधी यांनी मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्येच केले होते. खर्गे यांच्यावरील ‘मल्लिकार्जुन खर्गे : पॉलिटिकल एंगेजमेंट विथ कॅम्पेन, जस्टिस अँड इनक्लुसिव्ह डेव्हलपमेंट’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी सोनिया यांनी त्याचा जाहीर उच्चार केला होता.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
चर्चासत्रांत काँग्रेस प्रवक्ते नाहीत
काँग्रेस पक्षाने शुक्रवारी एक मोठा निर्णय घेतला. सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर शनिवारी संध्याकाळी विविध वृत्तवाहिन्या, सोशल आणि डिजिटल मीडियावर होणाऱ्या मतदानोत्तर चाचण्यांबाबतच्या (एक्झिट पोल) चर्चेसाठी आपले प्रवक्ते पाठवणार नाही, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. ‘अशा वादविवादांचे कोणतेही अर्थपूर्ण परिणाम होत नाहीत. चार जून रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर देशातील नागरिकांता कौल समोर येईल व काँग्रेस तो जनादेश मान्य करेल,’ असे पक्षसूत्रांचे म्हणणे आहे.