Pm Modi Meditation: भगवे वस्त्र, हातात जपमाळ, निकालाआधी पंतप्रधान मोदींचे ४५ तास ‘ध्यान’

तमिळनाडू : पंतप्रधान मोदींनी लोकसभा निवडणूकीचा प्रचार समाप्त होताच ध्यानधारणेला सुरुवात केली आहे. गुरुवारपासून कन्याकुमारीच्या विवेकानंद यांच्या स्मारकास्थळी पंतप्रधान मोदी ध्यानस्थ झाले होते. ध्यानधारणेच्या तिसऱ्या दिवशी त्यांनी सूर्याला जलार्पण केले आहे. यासोबतच स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण केला आणि हातामध्ये जपमाळ घेऊन मंदिराची परिक्रमा देखील केली आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ‘सूर्य अर्घ्य’ ही आध्यात्मिक साधनेशी संबंधित परंपरा आहे, ज्यामध्ये भगवान सूर्याला जल अर्पण करून पूजा केली जाते. तसेच मोदींनी ‘भगवे वस्त्र परिधान केले होते आणि त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. हातात जपमाळ घेऊन मंडपाभोवती प्रदक्षिणा देखील घातल्या अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३० मे च्या सायंकाळी कन्याकुमारी गाठली आणि सर्वप्रथम कन्याकुमारी देवीला समर्पित असलेल्या मंदिरात प्रार्थना केली. यानंतर तेथील स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकास्थळी आपल्या ध्यान साधनेला सुरुवात केली होती. तीन दिवसांची ही ध्यान साधना आज दुपारी समाप्त होत आहे. दरम्यान त्यांच्या या ध्यानसाधनेचे व्हिडीओ आणि फोटो देखील समोर आले आहेत.

भाजपाने पंतप्रधान मोदींच्या कन्याकुमारीतील ध्यानधारणेचा व्हिडीओ अधिकृत एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला आहे. यासोबतच पक्षाने त्यांचे काही फोटो देखील पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये ते भगव्या वस्त्रात ध्यान मंडपात ध्यानस्थ झाल्याचे दिसून येतात.

ध्यान साधना संपताच पंतप्रधान मोदी आज दुपारी ३.३० च्या सुमारास दिल्लीला रवाना होणार आहेत. तत्पूर्वी पंतप्रधान मोदींनी याआधीच्या निवडणुकीनंतर सुद्धा अशी ध्यान साधना केली होती. केदारनाथच्या गरुड चट्टी येथे त्यांनी ध्यान केले होते. यावेळेस त्यांनी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या दृश्यांसाठी प्रसिद्ध असलेली कन्याकुमारीची ध्यान साधनेसाठी निवड केली होती.

कडक सुरक्षाव्यवस्था

विवेकानंद शीलास्मारकातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ४५ तासांच्या मुक्कामासाठी कडक सुरक्षेसह सर्व व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण कन्याकुमारी जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक होती. सुमारे दोन हजार पोलिस तैनात करण्यात आले होते. याशिवाय तटरक्षक दल आणि नौदलाचा बंदोबस्तही वाढवण्यात आला होता.

काँग्रेसकडून टोला

पंतप्रधान मोदींच्या ध्यानधारणेचा व्हिडीओ आणि छायाचित्रे प्रसिद्ध होताच, काँग्रेसने त्यावर उपरोधिक टीका केली. ‘किती अँगल! किती व्हिडीओग्राफर! स्वामी विवेकानंद गप्प आहेत’, असा टोला तमिळनाडू काँग्रेसचे अध्यक्ष के. सेल्वापेरून्थगाई यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये द्वारे लगावला.

‘नरेंद्र मोदी उत्कृष्ट अभिनेते’

‘नरेंद्र मोदी हे उत्कृष्ट अभिनेते आहेत. त्यांना यावर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन का मिळाले नाही’, अशी खोचक टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. पंतप्रधान मोदी सध्या कन्याकुमारीमध्ये ध्यानधारणा करत आहेत, त्यावरून आंबेडकर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

Source link

election 2024election resultskanyakumariloksabha electionpm modi meditationpmo indiasaffron clothesपंतप्रधान मोदीभगव्या वस्त्रातील ध्यानमोदींचं ध्यानलोकसभा निवडणूक निकाललोकसभेची रणधुमाळी
Comments (0)
Add Comment