हायलाइट्स:
- गुंतवणूकदारांची आठ कोटींची फसवणूक.
- व्हीजीएन ज्वेलर्सच्या मालकाला अखेर अटक.
- व्हीजीएनची सर्व दुकाने पोलिसांनी केली सील.
ठाणे: गुंतवणूक योजनेच्या माध्यमातून कमी कालावधीमध्ये जास्त पैसे देण्याचे आमिष दाखवून १३ गुंतवणूकदारांची जवळपास ८ कोटींची फसवणूक करणाऱ्या ‘ व्हीजीएन ज्वेलर्स ‘चा मालक विरीथगोपालन नायर याला ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. न्यायालयाने नायर याला ९ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. ( VGN Jewellers Owner Arrested )
वाचा: आर्यन खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; NCBची ‘ती’ विनंती कोर्टाने फेटाळली
कल्याण पूर्वेकडे तसेच डोंबिवली पूर्व, उल्हासनगर आणि मुलुंड येथेही व्हीजीएन ज्वेलर्सची दुकाने असून दुकानात येणाऱ्या ग्राहकांना दर महिना ५०० रुपये दोन वर्ष गुंतवल्यास १४ हजार रुपये मिळतील किंवा या रकमेच्या बदल्यात सोने देण्यात येईल. तसेच एक वर्ष आणि पाच वर्षाच्या मुदत ठेवीमध्ये पैसे गुंतवल्यास वार्षिक १५ टक्के दराने व्याज देण्यात येईल, असे आमिष दाखवण्यात येत होते. नवीन गुंतवणूकदारांचे पैसे जुन्या गुंतवणूकदारांना व्याजाच्या स्वरूपात परत दिले जात होते. या वित्तीय योजनेच्या आमिषाला बळी पडून गुंतवणूकदारांनी योजनांमध्ये पैसे गुंतवले. मात्र, गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची रक्कम आणि त्यावरील परतावा न मिळाल्याने ६६ लाख ३६ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेच्या तक्रारीवरुन कोळशेवाडी पोलीस ठाण्यात दुकानाचा मालक विरीथगोपालन नायर, त्याची पत्नी आणि मुलाविरुद्ध ९ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास ठाणे आर्थिक गुन्हे शाखा करीत असून आतापर्यंत तक्रारदारासह एकूण १३ गुंतवणूकदारांची तब्बल ७ कोटी ९९ लाख ६३ हजार ७१० रुपयांची फसवणूक झालेली आहे. या प्रकरणी २५ दिवसांनी चौकशीनंतर मुख्य आरोपी विरीथगोपालन नायर याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रशांत सावंत करीत आहेत.
वाचा:‘त्या’ रात्री गोसावी व भानुशाली NCB कार्यालयात परत आले होते!; मलिक यांनी दिला पुरावा
सर्व दुकाने सील
फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता पोलीस निरीक्षक प्रशांत सावंत यांनी व्यक्त केली आहे. तसेच व्हीजीएन ज्वेलर्सची दुकाने सील करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. फसव्या योजनांच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच व्हीजीएन प्रकरणातील गुंतवणूकदारांनी ठाणे आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वाचा: ड्रग्ज पार्टी: मंत्री नवाब मलिक यांचा ‘तो’ आरोप एनसीबीने फेटाळला