फोन चोरी केल्यावर चोर सर्वप्रथम फोनमधून सिम कार्ड काढून फेकण्याचे काम करतो, परंतु चोराला सिम कार्ड स्लॉटमध्ये सिमच मिळालं नाही तर? एक असं सिम पण आहे जे काढून फेकता येत नाही. ते म्हणजे ई-सिम! ई-सिम असलेल्या फोनमध्ये युजर्स आपला नंबर ई-सिम मध्ये कन्व्हर्ट करू शकतात. नव्या आयफोनमध्ये ई-सिम सपोर्ट मिळतो. तर काही अँड्रॉइड फोन्समध्ये देखील ई-सिम वापरता येतं. चला जाणून घेऊया ई-सिम म्हणजे काय आणि याचा वापर तुम्ही कशाप्रकारे करू शकता.
ESIM म्हणजे काय आणि याचे फायदे
सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ई-सिम म्हणजे तुमच्या फिजिकल सिमचं डिजिटल व्हर्जन आहे. हे सिम फिजिकली सिम स्लॉट मध्ये टाकता येत नाही. तर तुमच्या स्मार्टफोनमध्ये एम्बेड केलेलं असतं. म्हणूनच जर फोन चोरी झाला तर चोर तुमच्या फोनमधून सिम काढून फेकू शकत नाही.
eSIM चा वापर कसा करायचा
ई-सिम वापरण्यापूर्वी तुमच्या स्मार्टफोनमध्ये ई-सिम सपोर्ट आहे का नाही ते चेक करा. काही फोन्समध्ये एक फिजिकल सिम स्लॉट असतो तर एक ई-सिम वापरता येते. जर तुमच्या फोनमध्ये ई-सिम सपोर्ट असेल तर टेलीकॉम ऑपरेटरशी संपर्क साधा कारण Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea अर्थात Vi सारख्या टेलीकॉम कंपन्या ग्राहकांना ई-सिमची सर्व्हिस देत आहेत.
जर तुम्हाला कस्टमर केयरवर कॉल करायचा नसेल तर तुम्हाला एयरटेल, रिलायन्स जिओ आणि विआयच्या ऑफिशियल साइट्सवर ई-सिम अॅक्टिव्हेट करण्याची माहिती मिळेल. तसेच तुम्ही ऑफिशियल स्टोरवर जाऊन ई-सिम अॅक्टिव्हेट करून घेऊ शकता.