हायलाइट्स:
- जिल्हा परिषद व पंचायत समितीत महाविकास आघाडीची सरशी
- भाजप ठरल क्रमांक एकचा पक्ष पण जागा गमावल्या
- शिवसेनेनं साधला भाजपवर निशाणा
मुंबईः महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. या निकालात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरीही भाजपला काही जागा गमवाव्या लागल्या आहेत. त्यावर बोट ठेवत शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेनेनं आजच्या सामनाच्या अग्रलेखातून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निकालावर भाष्य केलं आहे. (maharashtra zp election result)
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचे निकाल आले आहेत. प्रत्येक जण आपापल्या सोयीने या निकालांचे अर्थ लावीत आहे. आम्हीच कसे ‘मोठे’ किंवा लोकांनी आमच्याच डोक्यावर कसा विजयाचा मुकुट ठेवला असे सांगण्याची चढाओढ सुरू आहे. त्या चढाओढीत भारतीय जनता पक्षाने नेहमीप्रमाणे आघाडी घेतली असली तरी कागदावरील निकालांचे आकडे खोटे बोलत नाहीत, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
ओबीसी आरक्षणाचा फटका बसल्यामुळं राज्यातील सहा जिल्हा परिषदांत पोटनिवडणुका घ्याव्या लागल्या. पंचायत समितीच्याही निवडणुका पार पडल्या. पंचायत समिती निवडणुकांत राज्यातील महाविकास आघाडीने १४४ पैकी ७३ जागांवर विजय मिळवला. भाजपास ३३ जागा जिंकता आल्या. आता गणितात कोणत्या आर्यभट्टाने किंवा भास्कराचार्याने ७३ पेक्षा ३३ आकडा मोठा असे सिद्ध केले ते ‘सरशी’वाल्यांनी सांगावे, अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपला टोला लगावला आहे.
महाराष्ट्रातील एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून भाजपाने आपली ताकद दाखवली आहे. भाजपाने २२ जागा जिंकल्या याचे दुःख वाटायचे कारण नाही, पण भाजपाने या पोटनिवडणुकांत अनेक जागा गमावल्या आहेत त्याचे काय? विधानसभा निवडणूक निकालातही भाजपा हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. त्यांचे १०५ आमदार निवडून आले, पण १०५ आमदार असलेला भाजपा आता एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून काम करीत आहे. तेव्हा जिल्हा परिषद-पंचायत समिती पोटनिवडणुकांच्या निकालाचे विश्लेषण म्हणा किंवा पंचनामा म्हणा, कुणाला काय करायचा तो करू देत, पण विरोधी पक्षाचे म्हणणे जनता मनावर घेणार नाही, असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.
काँग्रेसने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भाजपाला मात दिली. अकोल्यात ऍड. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीचा वरचष्मा राहिला. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या ताब्यातील नरखेड पंचायत समितीवर भाजपाने चढाई केली. प्रत्येक जय-विजयाची स्वतंत्र कारणे आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुकांत महाविकास आघाडीची सरशी नक्कीच झाली, पण अनेक ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्ष स्वतंत्रपणे लढूनही भाजपाला पुढे जाता आले नाही. याचा अर्थ असा की, जनतेने भाजपाला जमिनीवरच ठेवले आहे. भाजपाने महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याची एकही संधी सोडली नाही. भ्रष्टाचाराचे, अफरातफरीचे बेफाम आरोप ते करीत राहिले. ईडी, सीबीआय, आयकरवाल्यांचा राजकीय वापर करून मंत्र्यांवर व आघाडीच्या नेत्यांवर दबाव टाकले. तरीही भाजपाला फार धावता आले नाही. महाविकास आघाडीने बाजी मारली हे मान्य करायला मनाचा मोठेपणा लागतो. राज्यातील विरोधी पक्षाकडे तेवढे विशाल मन उरले आहे काय?, असा सवालही शिवसेनेनं केला आहे.