गेल्या शनिवारी (२५ मे) झालेल्या सहाव्या टप्प्यात ६३.३६ टक्के मतदान झाले होते. त्यापूर्वी २० मे रोजी झालेल्या पाचव्या टप्प्यात सर्वात कमी ६२.२ टक्के मतदान झाले आहे. शेवटच्या टप्प्यात पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि चंडीगडसह आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत मतदान झाले. पंजाबमधील १३, उत्तर प्रदेश १३, पश्चिम बंगाल नऊ, बिहार आठ, ओडिशा सहा, हिमाचल प्रदेश चार, झारखंड तीन आणि चंडीगडच्या जागेसाठी मतदान झाले.
अखेरच्या टप्प्यातही पश्चिम बंगालमधून हिंसाचाराच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे आल्या आहेत. ईव्हीएममध्ये बिघाड, एजंटांना मतदान केंद्रांमध्ये प्रवेश करण्यापासून रोखणे, मतदानकेंद्रे तलावात फेकून देणे आणि मतदारांना धमकावल्याचे आरोप करण्यात आले आहेत. बंगालमधील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी आणि भाजपचे अमित मालवीय यांनी संदेशखाली येथे आंदोलन करणाऱ्या महिलांचे व्हिडीओ शेअर केले आहेत. ममता बॅनर्जी सरकारवर मतदारांना घाबरवण्यासाठी तृणमूल कार्यकर्ते व पोलिसांना मुक्त वाव दिल्याचा आरोप या महिलांनी केला. तृणमूलच्या कार्यकर्त्यांच्या एका गटाने ‘एआयएसएफ’चे उमेदवार नूर आलम खान यांच्या वाहनावर हल्ला केल्याचीही तक्रार आली.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार रात्री ८पर्यंत पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ६९.८९ टक्के मतदान झाले आहे. बिहारमध्ये सर्वांत कमी सुमारे ५० टक्के मतदानाची नोंद झाली. झारखंडमध्ये ६९.०३ टक्के, हिमाचल प्रदेश ६७.४०, चंदीगड ६३, ओडिशा ६३.४२, पंजाब ५५.७० आणि उत्तर प्रदेशमध्ये ५५.९० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आयोगाच्या वतीने अंतिम आकडेवारी देण्यात आलेले नाही.
याआधीच्या टप्प्यांतील मतदान (टक्के)
पहिला -६६.१४
दुसरा – ६६.७१
तिसरा – ६५.६८
चौथा – ६९.१६
पाचवा -६२.०२
सहावा – ६३.३६