हायलाइट्स:
- डोंगरात कोरलेल्या गुहेत आहे मत्स्योदरी देवीचं सुरेख मंदिर
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले मंदिराचे निर्माण
- वाचा नावामागची अख्यायिका
जालना : जालना जिल्ह्याचे आराद्यदैवत असलेल्या अंबडच्या श्री. मत्स्योदरी देवीच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. करोनाचे सर्व नियम पाळून भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा, दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत. श्री. मत्स्योदरी देवस्थानकडून नवरात्र महोत्सवाची तयारी झालेली असून घटस्थापना झाली आहे.
या मंदिराचे निर्माण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले असून माशांच्या आकाराच्या डोंगरामुळे याला मत्स्योदरी म्हटले जाते. मत्स्योदरी अंबिका देवीचे मंदिर हे मराठा स्थापत्य शैलीचे असून होळकरकाळात नावारुपाला आलेले देवस्थान आहे. सुभेदार मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सुभेदार तुकोजीराव होळकर, सुभेदार काशिराव होळकर, महाराजा यशवंतराव होळकर, द्वितीय मल्हारराव होळकर यांच्या काळातील अनेक कागदपत्रांतून देवस्थान सबंधीत माहिती वाचायला मिळते.
खासकरून नगारखाना, पुजाअर्चासाठी महादजी यादव यांना नुतन करुन दिलेली गुरवपणाची सनद, बांधलेली बारव, तलाव, अन्नछत्र तसेच शिलालेख आदीतून होळकर राजघराण्यांचे योगदान दिसून येते. या मंदिराच्या विविध आख्यायिका प्रसिद्ध आहेत.
महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती असे तीन तांदळे अंबिका देवीचे असून डोंगरात कोरलेल्या गुहेत जमिनीपासून दिडशे फुट उंचीवर हे मंदिर होते. भाविकांना देवीच्या दर्शनासाठी जातांना अडचणीचा सामना करावा लागत असे. सन १७६७ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सुंदर असे मंदिर निर्माण कार्य सुरू करण्याचे ठरवून डोंगरावर असलेल्या काळ्या पाषाणाचा वापर करुन सुंदर असे देवालय बांधून घेतले.
उंच कळस सभामंडप, नगारखाना दिपमाळा, गर्भगृह, शिवालय, नंदी, गणपती, माहुरची रेणुका, जंगदबा मुर्तीसह अन्नछत्र, धर्मशाळाचे निर्माण केले. देवीच्या पुजेअर्चेसाठी पुष्पवाटीका तसेच तलाव निर्माण करुन शेजारी तलाव खोदण्यात आला. तेंव्हा पासून श्री. मत्स्योदरी देवी मंदिराच्या परंपरा आजही कायम असून पाळल्या जात आहे. नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भक्तांचा ओघ सुरू असतो.