मतमोजणीच्या ठीक २ दिवस आधी मोदींनी ७ मोठ्या बैठकांचे आयोजन केले आहे. ज्याची अध्यक्षता खुद्द मोदींकडेच असणार आहे. ज्यामध्ये प्राधान्याने ईशान्येकडील राज्यांतील रेमल चक्रीवादळाची स्थिती आणि देशातील उष्णतेच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. तर सरकार स्थापन झाल्यावर पहिल्या १०० दिवसांच्या अजेंड्यावर विचारविमर्श केला जाणार आहे.
तसेच ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी देखील एक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. निकालाआधीच या ७ बैठका होत असल्याने मोदी सरकार मोठे निर्णय घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदी सरकार 3.0 च्या पहिल्या १०० दिवसांच्या कामांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. विविध केंद्रीय मंत्रालयांना पहिल्या १०० महत्वाच्या कामांना प्राधान्य देण्यास सांगितले होते. या १०० दिवसांत मोदी सरकार मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींच्या सूचनेनुसार एक मसुदा तयार केल्याचे समजते. ज्याचा आढावा आजच्या बैठकीत घेतला जाणार आहे.
दरम्यान मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक्झिट पोल देखील समोर आले आहेत. ज्यामध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलनुसार एनडीएला ३५० वर जागा मिळणार असल्याचे समजते. तर दुसरीकडे इंडिया आघाडी २९५ जागांवर मिळवणार, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशाचा कारभार कोणाच्या हाती जाणार हे ४ जूनच्या निकालातून स्पष्ट होणार आहे.