खर्गे आणि गांधी यांच्यासह पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश आणि के. सी. वेणुगोपाल यांच्यासह इतर ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाच्या लोकसभा उमेदवारांशी रविवारी संवाद साधला. तसेच ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या तयारीचा आढावा घेतला. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला मोठे बहुमत मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलनी शनिवारी वर्तवल्याच्या पार्श्वभूमीवर, दुसऱ्या दिवशी काँग्रेसची ही बैठक झाली.
शनिवारी खर्गे यांच्या निवासस्थानी ‘इंडिया’ची अडीच तास बैठक
विरोधकांच्या ‘इंडिया’ गटातील राजकीय पक्षांच्या नेत्यांचीही शनिवारी नवी दिल्लीत बैठक झाली होती. या नेत्यांनी जून रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीपर्यंतच्या तयारीचा आढावा घेतला. ‘इंडिया’ गटाला २९५ पेक्षा जास्त जागा मिळतील, त्या सत्तास्थापनेसाठी पुरेशा आहेत, असा ठाम दावा या आघाडीच्या नेत्यांनी केला होता. खर्गे यांच्या निवासस्थानी तब्बल अडीच तास झालेल्या विचारमंथनानंतर खर्गे यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केले. ‘मंगळवारी मतमोजणीच्या दिवशी घ्यायची खबरदारी यासह अनेक मुद्द्यांवर आघाडीच्या नेत्यांनी चर्चा केली. सर्व औपचारिकता पूर्ण होईपर्यंत कार्यकर्त्यांना मतमोजणी सभागृह सोडू नये, असे निर्देश दिले आहेत,’ असे त्यांनी सांगितले होते.
‘१५० दंडाधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांना शहांचे बोलावणे’
शनिवारी संध्याकाळी जाहीर झालेले एग्झिट पोलचे निष्कर्ष ‘पूर्णपणे बोगस’ आहेत आणि ‘४ जून रोजी गच्छंती अटळ असलेल्या व्यक्तीने ते तयार केले आहेत,’ या शब्दांत जयराम रमेश एग्झिट पोलवर टीकास्त्र सोडले. पायउतार होणार असलेले पंतप्रधान (नरेंद्र मोदी) आणि गृहमंत्री (अमित शहा) यांच्या मानसिक खेळीचा तो भाग आहे. पायउतार होणार असलेल्या गृहमंत्र्यांनी दीडशे जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना काल बोलावले होते. एक्झिट पोलचे निष्कर्ष आणि वास्तवाचा काहीही संबंध नाही,’ अशी टीका रमेश यांनी केली.