हायलाइट्स:
- ११ ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक
- शरद पवारांनी जनतेला केलं मोठं आवाहन
- भाषणात पवारांची भाजपवर टीका
सोलापूर : लखीमपूर शेतकरी हत्या प्रकरणानंतर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात देश आणि राज्यातील विरोधक एकवटले आहेत. शेतकऱ्यांना चिरडून मारल्याचा निषेधार्थ येत्या ११ ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे.त्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा ! असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
सोलापूरात आज राष्ट्रादीचा मेळावा पार पडला. यावेळी शरद पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली. भाजपच्या हाती सत्ता आहे म्हणून त्यांच्याकडून होणारा दुरुपयोग सगळ्यांनाच दिसत आहे. शांततेच्या मार्गाने निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजप कार्यकर्त्यांनी गाड्या घातल्या आहेत. ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे. त्यांना शेतकऱ्यांबद्दल काय आस्था नाही. शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून भाजपा कार्यकर्त्यानी शेतकऱ्यांची हत्या केली आहे. शेतकऱ्यांची हत्या करण्याचा निर्णय घेणाऱ्या या भाजप सरकारचा विरोध करण्यासाठी ‘भारत बंद’चा निर्णय घेतला आहे.असं ही पवार यावेळी म्हणाले.
पुढं बोलताना पवार म्हणाले की, पंडित जवाहरलाल नेहरुनी या देशातल्या सामान्य माणसाला पायाभूत सुविधा कशा देता येतील यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, आजचे मोदी सरकार सर्वचं गोष्टी व्यापाऱ्यांच्या हातात देत आहे. त्यात बंदरं, विमानतळं, दळणवळणाची साधने या सर्व गोष्टींच्या खासगीकरणाचे प्रयत्न केंद्राचे सुरु असल्याचे पवारांनी या मेळाव्यात आवर्जून सांगितले.
भाजपचं राज्य येणार म्हणून आडाखे लावले जात होते पण आज उद्धव ठाकरे आणि अजित पवारांच्या नेतृत्वात सरकार आले आहे. त्यामुळे ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे. त्याचा उपयोग वेगळ्या पद्तीने होत आहे. अशी टीकाही पवारांनी भाजपचे नांव न घेता केली. त्यावेळी त्यांनी, काल अजित पवारांकडे सरकारी पाहुणे येऊन गेले आहेत. पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. निवडणुकीच्या अगोदर मला इडीची नोटीस दिली आणि महाराष्ट्राने त्यांना येडी ठरवल्याचंही पवारांनी ठासून सांगितलं.