काही दिवसांपासून आसामच्या अनेक भागांना पुराने वेढा दिला आहे. राज्यातील दहा जिल्ह्यांतील सहा लाखांहून अधिक जण पूरबाधित असल्याचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने शनिवारी जाहीर केले होते. परिस्थितीत किंचित सुधारणा झाल्याने रविवारी रात्री बाधितांच्या संख्येत किंचित घट नोंदवण्यात आली. मात्र, कोपिली, बराक आणि कुशियारा या नद्या अद्यापही धोक्याच्या पातळीवरून वाहत असून, अनेक नवे भाग जलमय झाले.
पुराचा सर्वाधिक फटका नागाव जिल्ह्याला बसला. या जिल्ह्यातील ३,०३,५६७ लोकांना पुराचा फटका बसला आहे. त्यापाठोपाठ काचर (१,०९,७९८) आणि होजई (८६,३८२) या जिल्ह्यांचा समावेश आहे. अनेक जिल्ह्यांत रस्ते, पूल आणि अन्य पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे.
– सुमारे ३९ हजार जणांचा १९३ निर्वासित शिबिरांमध्ये आसरा
– मदतवस्तू वाटपासाठी ८२ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत
– ‘एनडीआरएफ’, ‘एसडीआरएफ’ आणि स्थानिक प्रशासनाकडून मदतकार्य
– पूरबाधित भागांमध्ये नागरिकांसाठी वैद्यकीय पथकांचीही पाठवणी