राणे म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी पाहुण्यासारखं सिंधुदुर्गात यावं, पाहुणचार करू, पण…’

हायलाइट्स:

  • सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं उद्या उद्घाटन
  • उद्धव ठाकरे-नारायण राणे एकाच व्यासपीठावर येणार
  • नारायण राणे म्हणाले, विमानतळाचे श्रेय आमचेच!

मुंबई: सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं उद्घाटन (Chipi Airport Inauguration) उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते होत आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे व केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. मात्र, उद्घाटनाच्या आदल्या दिवशीच, आज नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन विमानतळाचं श्रेय माझं आणि भाजपचं असल्याचं ठणकावून सांगितलं. ‘मुख्यमंत्र्यांनी पाहुण्यासारखं यावं. पाहुणचार करू,’ असं नारायण राणे म्हणाले.

चिपी विमानतळासाठी मी अनेक प्रयत्न केले आहेत. प्रफुल्ल पटेलांपासून अनेक केंद्रीय मंत्र्यांना भेटलो आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना घेऊन दिल्लीला गेलो आहे. मात्र, शिवसेनेचे लोक काही न करता श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्याच्या उद्योगमंत्र्यांचं काम शून्य आहे. चिपी विमानतळामध्ये इतर कोणाचा श्रेय नाही. पाहुणे म्हणून आम्ही बोलवलंय. पाहुणे म्हणून या, पदाप्रमाणं काही तरी द्या आणि जा,’ असं राणे मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हणाले.

वाचा: ‘फडणवीसांना आमंत्रण का नाही? सुभाष देसाईंच्या घरचा कार्यक्रम आहे का?’

‘हातचं राखून ठेवण्याचा माझा स्वभाव नाही. उद्याच्या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्याचा संदर्भ घेऊन बोलणार. हे विमानतळ आम्हीच केलंय हेही सांगणार. आमच्या मुलाचं नाव आम्हीच ठेवणार. दुसऱ्याला कशाला बोलवणार? तुम्ही कबुल करा. तुम्ही या, उद्घाटन करा. तुम्हाला मान देतो. पण काम आम्ही केलंय हे मान्य करा. काही लोक काम न करता मिरवताहेत हे मला पटत नाही. उद्धव ठाकरे आल्यावर त्यांचा पाहुणचारही करू,’ असंही राणे म्हणाले.

आमंत्रण पत्रिकेत माझंच नाव बारीक कसं झालं?

‘आमंत्रण पत्रिकेत नेमकं माझं नाव बारीक झालं आहे. त्यावरची शाईही पसरली आहे. मी राजकारणात आणि प्रोटोकॉलनुसार देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ज्योतिरादित्य शिंदे या दोघांपेक्षा सीनियर आहे. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव पहिलं असेल तर माझी हरकत नाही. माणूस कोण आहे ह्याचा संबंध नाही. पण माझं नाव बारीक का झालं हे माहीत नाही. ही एक वृत्ती आहे’, असं सांगत राणे यांनी आमंत्रण पत्रिकाच दाखवली.

Source link

Chipi airportNarayan RaneNarayan Rane Latest News TodayNarayan Rane on Chipi AirportSindhudurgUddhav Thacekrayचिपी विमानतळचिपी विमानतळ उद्घाटन
Comments (0)
Add Comment