नगीना हा उत्तरप्रदेशातील बिजनोर जिल्ह्यातील अनुसुचित जातींसाठी राखीव मतदारसंघ असून यावेळी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद हे या मतदारसंघातून लढत असल्यापासून तिथल्या जातिय समीकरणांमूळे हा मतदारसंघ चर्चेत आलेला होता.उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्ष आणि कॉंग्रेसच्या आघाडीमध्ये हा मतदारसंघ समाजवादी पार्टीच्या वाट्याला आला होता.परंतू आतापर्यंत झालेल्या मतमोजणींमध्ये इथे समाजवादी पक्ष तिसऱ्या क्रमांकावर दिसून येत आहे.तर भाजप इथे दुसऱ्या क्रमांकावर दिसत आहे.
कोण आहेत चंद्रशेखर आझाद ?
चंद्रशेखर आझाद हे भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष आहेत.उत्तर भारतातील दलित-बहुजन राजकारणात गेल्या काही दिवसात त्यांनी घेतलेल्या महत्वपूर्ण सामाजिक-राजकीय भूमिकांमूळे ते चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.त्यांच्या राजकीय क्षेत्रातील पदार्पणामूळे बहुजन समाज पार्टीच्या राजकीय समीकरणांत मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाल्याचे मानले जाते.उत्तरप्रदेशातील सहारणपूर येथील दंगलीतून त्यांना अटक करण्यात आलेली होती.त्यानंतर न्यायालयाने त्यांची अटक ही राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगत त्यांना जामीन मंजूर केला होता.तेव्हापासून चंद्रशेखर आझाद हे चर्चेत आले होते.नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधातील आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रीय सहभाग घेतल्याने मुस्लीम समाज मोठ्या संख्येने त्यांच्याशी जोडला गेला होता.नगीना लोकसभा मतदारसंघात जवळजवळ १५ लाख मतदार असून बहुतांश दलित मतदार आहेत.तर इथे मुस्लीम मतदारही निर्णायक आहे.
मतदारसंघाची पार्श्वभूमी
नगीना मतदारसंघ हा २००९ मध्ये अस्तित्वात आला.तेव्हापासून या जागेवर वेगवेगळ्या पक्षांचे अस्तित्व राहिले आहे.२००९ मध्ये समाजवादी पार्टीचे यशवीर सिंह,२०१४ मध्ये यशवंत सिंह तर २०१९ च्या निवडणूकीत बहुजन समाज पार्टीचे गिरिश चंद्र हे या जागेवरून विजयी झाले होते.