मोदींनी जिथे सभा घेतल्या तिथून कॉंग्रेसला ३००० मतांची लीड
दक्षिण गोव्याची परिस्थिती पाहता कॉंग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरीटो फर्नांडीस हे २१६०२२ इतकी मते घेत विजयी झाले असून त्यांच्या विरोधात उभ्या भाजपच्या पल्लवी श्रीनिवास डेंपो या २०४७१ मतांनी पिछाडीवर होत्या. मतमोजणी जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचली असून फर्नांडीस यांचा विजय निश्चित मानला जात आहे.आपल्या विजयाबद्दल बोलताना फर्नांडीस म्हणाले की, “गोव्याच्या जनतेने बेरोजगारी,धार्मिक भेदभाव व सत्तेच्या गैरवापरा विरोधात मतदान केले आहे.मी लोकांचा व सहकारी पक्षांचा आभारी आहे.पंतप्रधान मोदींनी जिथे सभा घेतल्या तिथून कॉंग्रेसला ३००० मतांची लीड मिळाली आहे.” कॉंग्रेसचे उमेदवार विरीटो फर्नांडीस हे भारतीय नौदलातील माजी कॅप्टन आहेत.
२०२२ साली झालेल्या गोव्यातील विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेसकडून उभे असलेले विरीटो यांचा पराभव झाला होता.त्यानंतर पक्षाकडून त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली गेली त्यात ते यशस्वी झाले आहेत.गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते युरी आलमावो म्हणाले की ‘ही निवडणूक कॉंग्रेससाठी २०२७ च्या विधानसभा निवडणूकांची सेमीफायनल होती ती आम्ही जिंकली.’
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी आपला गड राखला
श्रीपाद नाईक हे भाजपचे केंद्रीय बंदरे,जहाजबांधणी व जलमार्ग आणि भारत सरकारचे पर्यटन मंत्री आहेत. २००९, २०१४ व २०१९ च्या निवडणूकांत ते सलग तीन टर्म खासदार राहिले असून याही वर्षी त्यांनी आपला गड राखला आहे.तिन्ही वेळेस त्यांनी कॉंग्रेसचा मोठ्या मतांच्या फरकाने पराभव केला होता.२०१९ मध्ये त्यांना ५७.७ टक्के मते प्राप्त झाली होती.२०१९ च्या लोकसभा निवडणूकांमध्ये नाईक यांनी कॉंग्रेसचे उमेदवार गिरीश चोडणकर यांचा ८०२४८ मतांनी पराभव केला होता.आपल्या विजयावर बोलताना ते म्हणाले की ‘पक्षाचा उत्तर गोव्यातील हा विजय आम्हाला अपेक्षित होता.’
लोकसभा निवडणूकांच्या तिसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानामध्ये गोव्यात ७७.१९ टक्के मतदान झाले होते.दोन्ही निकाल अंतिम मानले जात असून आता फक्त विजयाची औपचारीक घोषणा बाकी आहे.