ॲक्सिस माय इंडियाचे एमडी प्रदीप गुप्ता यांनी आत्मविश्वासाने भाकीत केले होते की भाजप ४०० पेक्षा जास्त जागा जिंकेल. लाइव्ह शो दरम्यान, खरा निकाल त्याच्या अंदाजाच्या विरोधात येऊ लागल्याने, गुप्ता भावूक झाले. त्याने एक्झिट पोल कुठे चुकले हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि चुकीबद्दल माफी मागितली तसेच ढसढसा रडले सुद्धा. याआधी प्रदीप गुप्ता यांना एक्झिट पोलच्या अंदाजांमुळे सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागला होता.
निकालाच्या एक दिवस आधी गुप्ता यांनी ‘आमच्या ६९ पैकी ६५ एक्झिट पोल बरोबर होते’ अशी टिप्पणी केली होती. एक्झिट पोल हे ‘मोदी मीडिया पोल’ आणि ‘फँटसी पोल’ असल्याच्या काँग्रेस नेते राहुल गांधींच्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले होते, ते म्हणाले, राहुल गांधींचे असे म्हणणे म्हणजे “द्राक्षे आंबट आहेत असे म्हणण्यासारखे आहे.”
गुप्ता यांनी राहुल गांधींच्या राजकीय कारकीर्दीवर भाष्य करत “राहुल गांधी किंवा काँग्रेसने इंडिया आघाडी म्हणून निवडणुका लढवल्या आहेत. प्रादेशिक पक्षांनी तमिळनाडू, महाराष्ट्र, बिहार, झारखंडसारख्या वेगवेगळ्या भागात निवडणुका लढवल्या आहेत; तिथल्या प्रादेशिक पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या आहेत. राहुल गांधींना ब्रँड म्हणून पाहिले जात नाही “अशी टिप्पणी गुप्ता यांनी नमूद केली. पुढे ते म्हणाले, “कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशात जिथे काँग्रेसची सत्ता आहे, तिथे काँग्रेसचे मतदार राहुल गांधींच्या नावाने मतदान करत नाहीत.
ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलने एनडीएला ३६१-४०१ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. गुप्ता यांच्या एक्झिट पोलने असेही सांगितले होते की ‘इंडिया’ आघाडीला १३१ – १६६ जागांवर समाधान मानावे लागेल. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीचे निकाल हाती आले तेव्हा चित्र वेगळेच दिसून आले. भाजप आता स्वबळावर बहुमत मिळवण्यापासून दूर आहे.