अखिलेश यादव यांचा कन्नौज मतदारसंघातून विजय
अखिलेश हे कन्नौज मतदार संघातून निवडणुकीसाठी उभे होते. या जागेवरून अखिलेश हे १ लाख ७० हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार त्यांना ६,४२,२९२ मते मिळाली. त्यांच्या विरोधात भाजपचे सुभ्रत पाठक यांना ४ लाख ७१ हजार ३७० मते मिळाली. बसपाचे इम्रान बिन जफर हे ८१ ,६३९ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर होते.
डिंपल यादव यांचा मैनपुरी मतदारसंघातून विजय
मैनपुरी मतदारसंघातून अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांचा विजय झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, डिंपल यांना ५,९८,५२६ मते मिळाली आहेत. त्यांच्या विरोधात योगी यांच्या मंत्रीमंडळात मंत्री म्हणून राहिलेले जयवीर सिंग हे उभे होते. त्यांचा डिंपल यादव यांनी पराभव केला आहे.
मैनपुरी समाजवादी पक्षाचा बाले किल्ला
मैनपुरी लोकसभा मतदारसंघ हा समाजवादी पक्षाचा ‘बाले किल्ला’ म्हणून ओळखला जातो. १९८९ आणि १९९१ मध्ये जनता पक्षाने या जागेवरून विजय मिळवला, त्यानंतर १९९२ मध्ये सपा आणि पक्ष स्थापन केल्यानंतर मुलायम सिंह यादव यांनी १९९६ मध्ये येथून निवडणूक लढवली आणि विजयी झाले. तेव्हापासून या जागेला सपाचा बालेकिल्ला आणि बालेकिल्ला अशी उपमा दिली जात आहे. मुलायम सिंह यादव (१९९६, २००९, २०१४, २०१९), बलराम सिंह यादव (१९९८, १९९९), धर्मेंद्र यादव (२००४), तेज प्रताप यादव (२०१४) येथून खासदार राहिले आहेत.
आझमगड मतदारसंघातून अखिलेश यांचे चुलत भाऊ धर्मेंद्र प्रधान यांचा विजय
आझमगड मतदारसंघातून अखिलेश यांचे चुलत भाऊ धर्मेंद्र प्रधान यांचा विजय झाला आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार भोजपुरी सुपरस्टार दिनेश लाल यादव यांचा पराभव केला. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, धर्मेंद्र यादव यांना ५,०८,२३९ मते मिळाली तर दिनेश लाल यांना ३,४७,२०४ मते मिळाली आहेत
फिरोजाबादमधून अक्षय यादव यांचा विजय
अखिलेश यादव यांचे कुटूंबीय अक्षय यादव यांनी फिरोजाबाद मतदारसंघातून भाजपचे विश्वदीप सिंह यांचा ८९,३१२ मतांनी पराभव केला आहे. आकडेवारीनुसार अक्षय यादव यांना एकूण ५,४३,०३७ इतकी मते मिळाली आहेत. अक्षय यादव यांनी २०१४ मध्ये याच जागेवरून विजय मिळवला होता. परंतु २०१९ मध्ये चंदन सिंह यांच्याकडून पराभूत झाले होते.
बदाऊन मतदारसंघातून आदित्य यादव यांचा विजय
समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवपाल यादव यांचे चिरंजीव आदित्य यादव यांनी भाजपच्या दुर्विजय सिंह शाक्य यांचा ३४,९९१ मतांनी पराभव केला आहे. आदित्य यांना एकूण ५,०१,८५५ आणि शाक्य यांना ४,६६,८६४ मते मिळाली. यादव कुटुंबाची ही एकमेव जागा होती जिथे पराभव होण्याची जास्त भीती होती परंतु शेवट आदित्य यादव यांचा विजय झाला.
दरम्यान, अखिलेश यादव यांच्या कुटुंबातील एकूण पाच जणांनी निवडणूक लढवली होती. यातील सर्व उमेदवार विजयी झाले असून ते संसदेत जाणार आहेत.