यूपीतील नगिना मतदारसंघ राखीव होता.भाजपकडून तीन वेळा नटहौर मतदारसंघातून खासदार असलेले ओम कुमार यांना उतरवण्यात आले. समाजवादी पार्टी माजी न्यायाधीश मनोज कुमार यांना तिकीट दिले तर बसपाकडून सुरेंद्र पाल सिंह. भीम आझाद समाज पार्टीकडून चंद्रशेखर आझाद अशी तगडी लढत असलेले दिग्गज लोकसभेच्या रिंगणात होते. बिजनौर जिल्ह्यातील नगिना लोकसभा मतदारसंघ २००८ पासून अस्तित्वात आला आहे. जवळपास १५ लाख मतदार नगिना मतदारसंघात आहेत, दलित आणि मुस्लिम व्होटरची संख्या जास्तीची आहे.
आंबडेकरी विचारांमुळे चंद्रशेखर आझाद यूपीच्या राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत असतात. दलित समाजावरील अन्यायाविरोधात वाचा फोडणारे युवा नेतृत्व अशी ओळख त्यांची देशपातळीवर झाले. यूपीत चंद्रशेखर यांना रावण म्हणून सुद्धा ओळखले जाते. भीम आर्मी संघटनेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. २०२२ च्या विधानसभेत गोरखपूर विधानसभा क्षेत्रातून यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्या विरोधात चंद्रशेखर आझाद विधानसभेच्या रिंगणात होते, सात हजार मत त्यांना पडली होती.
राजकीय विश्लेषकांच्या मते चंद्रशेखर आझाद यांनी यूपीच्या राजकीय स्थितीचा बारकाईने अभ्यास करुन नगिना मतदारसंघ निवडलाय, कारण मोठ्या प्रमाणात दलित मुस्लिम व्होटर असल्याने आझाद यांना त्याचा थेट फायदा झालेला निकालात दिसतो. तसेच आगामी काळात याच व्होट बँकेचा आधार घेत चंद्रशेखर आझाद यूपीत आणखी पायमुळे खोल रोवतील. मतमोजणीत बसपाच्या सुरेंद्र पाल यांना फक्त १२ हजार ८१० मते मिळालीत तर भाजपच्या ओम कुमार यांना ३ लाख ४३ हजार ८२९, समाजवादी पार्टीच्या मनोज कुमार यांना ९९ हजार २६५ मते मिळाली पण सर्वाधिक मते मिळवण्याचा विक्रम चंद्रशेखर आझाद यांनी केलाय. आझाद यांना तब्बल ४ लाख ८६ हजार ६७८ मते पडलीत.
मायावती आणि बसपाचे टेन्शन वाढले?
नगिना मतदारसंघातील घवघवीत यशानंतर चंद्रशेखर आझाद यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळू लागले. मायावती यांचे राजकरण कांशीराम यांच्या नावाभोवती फिरते पण आता कांशीराम यांनाच आपले गुरु मानून चंद्रशेखर आझाद यांनी आझाद समाज पार्टी ( कांशीराम) नाव देत युपीचे दलित व्होटिंग समीकरण वळवण्याचा प्रयत्न केलाय. नगिना मतदारसंघात बसपाच्या उमेदवारांपेक्षा दुप्पट तिप्पट मतधिक्याने चंद्रशेखर आझाद यांनी लोकसभेची जागा काढली.