भारत जिंकला मोदी हरले
मंगळवारी पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालांनंतर राजकीय चित्र स्पष्ट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ‘मोदींनी अनेक पक्ष फोडले परंतु लोकांनी निवडणूकीतून त्यांचे मनोबल तोडले आहे. भारत जिंकला असून मोदी हरले आहेत.’ लोकसभा निवडणूकांतून कधीकाळी वरचस्मा असलेल्या बऱ्याच राज्यात भाजपला बसलेला फटका पाहता त्यावर भाष्य करताना त्या पुढे म्हणाल्या की “मोदींनी विश्वासार्हता गमावली आहे त्यामूळे त्यांनी राजिनामा दिला पाहिजे”.मोदींना सत्तेच्या बाहेर ठेवून इंडिया आघाडीला सत्तेत आणणे सुनिश्चित करण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ‘खेला होबे’
मंगळवारी रात्री उशीरा संपलेल्या मतमोजणीतून पश्चिम बंगालमधील एकूण ४२ जागांपैकी ममता बॅनर्जींच्या तृणमूल कॉंग्रेसला २९ जागी विजय मिळाला.तर भारतीय जनता पक्षाला १२ जागांवर समाधान मानावे लागले.२०१९ च्या लोकसभा निवडणूकांमध्ये भाजपच्या पदरात १८ जागा पडल्या होत्या तेव्हापासून मोदींसह अनेक नेत्यांनी आपला मोर्चा पश्चिम बंगालकडे वळवला होता परंतु कालच्या निवडणूक निकालांनी पश्चिम बंगालसह देशभरात भाजपला पुन्हा एकदा ‘खेला होबे’ ची आठवण करुन दिली आहे.ममता बॅनर्जी यांनी या लोकसभेत स्वबळावर निवडणूक लढविली होती. यामध्ये त्यांना सर्वाधिक जागा जिंकण्यात यश मिळाले आहे.लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये मार्च २०२४ पासून पंतप्रधान मोदींनी जवळपास २५ सभा घेतल्या तरी देखील २०१९ च्या लोकसभा निकालांच्या तुलनेत यावेळी तृणमूलच्या कोट्यात ७ अतिरिक्त जागांची भर पडली.त्यामूळे तृणमूलसाठी हा महत्वाचा विजय मानला जात आहे.कॉंग्रेसला या वेळी केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.
संदेशखाली प्रकरणावर भाष्य
पश्चिम बंगालच्या लोकसभा निवडणूकांदरम्यान देशभरात चर्चेत असलेल्या संदेशखाली प्रकरणावर ममतांनी निकालानंतर प्रथमच भाष्य केले.यावेळी त्या म्हणाल्या की “संदेशखाली मधील आमच्या माता भगिनींबद्दल अफवा पसरवूनही तिथल्या बसिरहाट लोकसभा मतदारसंघातून आम्ही विजयी झालो”. संदेशखालीमध्ये तृणमूल नेते शहाजहान शेख यांनी अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करत संदेशखालीतील महिलांनी त्यांच्याविरुद्ध आंदोलन पुकारले होते.यावर भाजपने ममता बॅनर्जी यांनी शहाजहान शेख यांना पाठीशी घातल्याचा आरोप करत या प्रकरणाद्वारे ममता बॅनर्जी यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.राजकीय फायद्यासाठी या मुद्दयाचा भाजपकडून चुकीचा वापर होत असल्याचा आरोप तृणमूल कॉंग्रेसने यावर केला होता.