२०१४ आणि २०१९ मध्ये भाजपनं २७२ जागांचा जादुई आकडा गाठला होता. पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. केंद्रात भाजपला मित्रपक्षांचा टेकू लागणार आहे. त्यामुळे आता भाजपसाठी एन फॅक्टर महत्त्वाचा असेल. उत्तरेतले नितीश कुमार आणि दक्षिणेतले चंद्राबाबू नायडू भाजपसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करायची असल्यास भाजपसाठी तेलुगु देसम पक्ष आणि संयुक्त जनता दलाचा पाठिंबा गरजेचा आहे.
एनडीएला सध्या २९३ जागा मिळताना दिसत आहे. यात भाजपच्या २४१ जागा आहेत. भाजपचे मित्रपक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाला १२ जागा मिळताना दिसत आहेत. तर तेलुगु देसम पक्षाला १६ जागा मिळतील अशी दाट शक्यता आहे. या दोन पक्षांकडे २८ जागा आहेत. त्यामुळे या दोन पक्षांनी वेगळा विचार केल्यास एनडीएकडे सत्ता स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ राहत नाही.
एनडीएतील मित्रपक्षांनी इंडिया आघाडीकडे जाऊ नये यासाठी भाजप नेतृत्त्वानं हालचाली सुरु केल्या आहेत. टिडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडूंना खुद्द पंतप्रधान मोदींनी कॉल केला आहे. तर बिहार भाजपचे अध्यक्ष आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी मुख्यमंत्री आणि जेडीयुचे अध्यक्ष नितीश कुमार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. पण त्यांची भेट होऊ शकलेली नाही. नितीश यांनी एक दिवस आधीच दिल्लीत मोदींची भेट घेतली होती.