जोगेश्वरी पूर्वेकडील मेघवाडी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांना एका गाळेधारकाकडून 1 लाखाची लाच मागणे अंगाशी आले. तडजोडीअंती गाळेधारकाकडून 40 हजारांची लाच घेताना पाटील आज अॅण्टी करप्शन ब्युरोच्या कारवाईत रंगेहाथ पकडल्या गेल्या. गुन्हे शाखेचा एपीआय लाच घेताना ट्रप झाल्याची घटना ताजी असतानाच पाटील लटकल्या.
सर्जेराव (नाव बदललेले) यांनी सुभाष नगरातील आपला गाळा भाडेतत्त्वावर दिला होता. त्यांनी तो गाळा पाच तारखेला भाडेकरूकडून पुन्हा आपल्या ताब्यात घेतला होता. दरम्यान, नीता महाडिक व तिच्या साथीदाराने गाळय़ाचे कुलूप तोडल्याने सहा तारखेला सर्जेराव तक्रार देण्यासाठी जोगेश्वरी पोलीस ठाण्यात गेले होते. पण तेथे तक्रार न घेतल्याने सर्जेराव सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांना त्यांच्या कार्यालयात भेटण्यासाठी गेले. तेव्हा तुमची तक्रार पोलीस ठाण्यात नोंद करण्यासाठी सांगते. तसेच पुन्हा त्या महाडिक व तिच्या सहकाऱयाकडून त्रास होऊ द्यायचा नसेल तर एक लाख रुपये द्या अशी मागणी पाटील यांनी केली होती. त्याचवेळी सर्जेराव यांनी दहा हजार पाटील यांना दिले. पण उर्वरित रक्कम द्यायची नसल्यामुळे सर्जेराव यांनी तक्रार दिली. त्यानुसार एसीबीने आज कारवाई केली.