१. पहिले म्हणजे अयोध्येत भाजपचा पराभव होणे. हा निकाल खरंच खूप धक्कादायक होता. कारण, जिथे भाजपने राम मंदिर उभारलं, संपूर्ण लोकसभा निवडणूक ज्या राम मंदिराच्या मुद्द्यावर लढवली, तिथेच भाजपला पराभवाला सामोरे जावं लागलं. अवघ्या चार महिन्यांपूर्वी, २२ जानेवारीला भव्य राम मंदिराचे उद्घाटन झाले. याचा भाजपला मोठा फायदा होईल, असं अनेकांना वाटत होतं. पण, त्याचा अगदी उलट झाले. फैजाबाद लोकसभेची जागा भाजपने गमावली. येथून समाजवादी पक्षाच्या उमेदवार निवडून आला. याशिवाय, अयोध्येतील इतर चार जागांवरही भाजपचा पराभव झाला आहे.
२. अमेठीमध्ये गांधी कुटुंबाच्या पारंपारिक जागेवर पुन्हा एखदा काँग्रेसने पुनरागमन केले आहे. गांधी कुटुंबातील कोणत्याही सदस्याने निवडणूक लढवली नसली तरी, गांधी कुटुंबाच्या जवळच्या किशोरीलाल शर्मा यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा १.७ लाख मतांनी पराभव केला. २०१९ मध्ये स्मृती इराणी यांनी अमेठीमध्ये राहुल गांधींचा पराभव केला होता.
३. मणिपूरमध्येही बदल झाला आहे. मणिपूरमधील हिंसाचारामुळे भाजपला मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला होता. त्याचाच परिणाम निवडणूक निकालांवर झाला आहे. या काँग्रेसने दोन्ही जागा जिंकल्या आहेत. डोंगराळ भागातील कुकी समुदाय आणि इम्फाळ खोऱ्यातील मैतेई समादाने काँग्रेसच्या बाजूने मतदान केले आहे.
४. केरळमध्ये भाजपला अनपेक्षित यश मिळाले आहेत. भाजपने पहिल्यांदाच केरळमध्ये आपले खाते उघडले. भाजप उमेदवार आणि अभिनेते सुरेश गोपी यांनी त्रिशूर लोकसभेची जागा जिंकली आहे. त्यामुळे भाजपच्या टॅलीमध्ये एक महत्त्वपूर्ण जागा जोडली गेली.
५. पश्चिम बंगालमधील संदेशखाली प्रकरण भाजपने उचलून धरलं. मात्र, त्याचा फारसा काही फायदा भाजपला झाला नाही. संदेशखाली वादावर भाजपने जोरदार प्रचार केला आणि ममता बॅनर्जी यांच्या सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यानंतरही तृणमूल काँग्रेसच्या नूरुल इस्लाम यांनी भाजपच्या रेखा पात्रा यांचा ३.४ लाख मतांनी पराभव केला. संदेशखाली प्रकरणात रेखा पात्रा या विरोध प्रदर्शनाचा मुख्य चेहरा होत्या.
६. उत्तर प्रदेशच्या नगीनामध्ये दलित नेते चंद्रशेखर आझाद यांनी आश्चर्यकारक विजय मिळवला आहे. बसपा किंवा समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याशिवाय निवडणूक लढवत आझाद समाज पक्षाचे प्रमुख हे तब्बल दीड लाख मतांनी विजयी झाले आहेत.
७. पंजाबचे निवडणूक निकालही तितकेच आश्चर्यकारक होते. बेअंत सिंग (इंदिरा गांधींचा मारेकरी) यांचा मुलगा सरबजीत सिंग खालसा यांच्यासह तुरुंगात डांबलेले खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग येथून विजयी झाले आहेत.
८. जम्मू-काश्मीरमध्ये आणखी एक आश्चर्यकारक निकाल लागला आबे. येथे UAPA अंतर्गत तुरुंगात असलेल्या अभियंता राशिद यांनी ओमर अब्दुल्ला यांचा पराभव करत बारामुल्ला लोकसभेतून खासदारकी मिळवली आहे.
९. गुजरातमध्ये काँग्रेसने भाजपला १०० टक्के विजय मिळवण्यापासून रोखण्यात यश मिळविले. येथील बनासकांठा सीट काँग्रेसने जिंकली, त्यामुळे सलग तीन निवडणुकांमध्ये सर्व जागा जिंकण्याचा भाजपचा रेकॉर्ड खंडित झाला आहे.
१०. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने लक्षवेधी कामगिरी केली. येथून यादव कुटुंबातील पाच सदस्य निवडून आले आहेत. अखिलेश यादव यांनी कन्नौजची जागा जिंकली, डिंपल यादव मैनपुरीमध्ये, आदित्य यादव बदाऊनमध्ये विजयी झाले, अक्षय यादवने फर्रुखाबाद जिंकले आणि धर्मेंद्र यादव आझमगडमध्ये विजयी झाले आहेत.