व्यावसायिक नोंदींमध्ये फेरफार करून, एका पॉर्न अभिनेत्रीला मोठी रक्कम दिल्याप्रकरणी ट्रम्प दोषी ठरले आहेत. हा निकाल आल्यानंतर दोनच दिवसांत त्यांनी टिकटॉकवर अकाउंट उघडले आहे. नेवार्कमधील ‘अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिप’ स्पर्धेतील लढत पाहण्यासाठी ट्रम्प आले होते. त्याचा व्हिडिओ त्यांनी टिकटॉकवर टाकला आहे. ‘हा सन्मान आहे,’ असे ट्रम्प या व्हिडिओमध्ये म्हणत आहेत. त्यानंतर, ट्रम्प यांच्या अकाउंटला सुमारे ११ लाख फॉलोअर मिळाले आहेत. तर, त्यांचा व्हिडिओ २.४ कोटी जणांनी पाहिला असून, १० लाख जणांनी त्याला लाइक केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनीही ‘टिकटॉक’वर बंदी घालण्याच्या विधेयकावर सही केली होती. मात्र, प्रचारामध्ये त्यांनी ‘टिकटॉक’वर अकाउंट काढले आहे.
अमेरिकेच्या निवडणुकीवर ‘टिकटॉक’चा प्रभाव
‘टिकटॉक’ अॅप चीनमधील ‘बाइटडान्स’ या कंपनीच्या मालकीचे आहे. अमेरिकेमध्ये १७ कोटी जणांचे अकाउंट आहे. यामध्ये बहुतांश अकाउंट तरुण आहेत. अमेरिकेतील हा तरुण वर्ग टीव्हीपासून दूर गेल्याचे मानले जाते. त्यामुळे, प्रचारात त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान उमेदवारांसमोर असून, ‘टिकटॉक’च्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न दोन्ही प्रमुख पक्षांचे उमेदवार करतील, असे मानले जाते.
नेते इच्छुक नाहीत; तरीही प्रभाव कायम
‘टिकटॉक’मुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे सांगून, त्या अॅपवर बंदी घालण्याचे आदेश ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या काळात दिले होते. मात्र, न्यायालयाने या आदेशाला स्थगिती दिली होती. माजी उपाध्यक्ष माइक पेन्स यांच्यासह अनेक नेत्यांनी ‘टिकटॉक’वर बंदी घालण्याची मागणी कायम ठेवली आहे. त्यामुळे, पक्षांतर्गत निवडणुकीतील बहुतांश इच्छुक या अॅपपासून दूर होते. ट्रम्पही गेल्या काही महिन्यांपूर्वीपर्यंत ‘टिकटॉक’वरील बंदीच्या मागणीवर ठाम होते. मात्र, राजकारणात पुन्हा मुसंडी मारण्यासाठी ‘टिकटॉक’ची मदत होईल, असा त्यांना विश्वास वाटत आहे. सन २०२०मधील निवडणुकीत फेसबुकच्या भूमिकेचा फटका ट्रम्प यांना बसला होता, असे मानले जाते.