भाजपकडून सत्ता स्थापनेची तयारी; ‘बिनसीट’ पाठिंबा देणाऱ्या आठवलेंची मोठी मागणी, RPIला काय हवं?

मुंबई: राज्यात लोकसभा निवडणुकीत एकही जागा वाट्याला न आलेल्या, शिर्डीतून लढण्यास उत्सुक असलेल्या, पण मित्रपक्षांमुळे संधी न मिळालेल्या रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्ये कॅबिनेट मंत्रिपद हवं आहे. संयुक्त जनता दल आणि तेलुगु देसम पक्षानंतर आता आठवलेंनी त्यांची मागणी पुढे केली आहे. मागणी करताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या आश्वासनाचा विशेष उल्लेख केला.

लोकसभेत आठवलेंच्या पक्षाचा एकही सदस्य नाही. दस्तुरखुद्द आठवले भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर गेले आहेत. आता आपल्या पक्षाला कॅबिनेट मंत्रालय मिळावं अशी त्यांची इच्छा आहे. ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे. मोदींनी घटना वाचवण्यासाठी काम केलं आहे. मी ८ वर्षांपासून राज्यमंत्री आहे. माझा पक्ष देशभरात काम करतो. आमचा पक्ष एनडीसोबत पूर्ण प्रामाणिकपणे राहिलेला आहे. राज्यात जागावाटपात आम्हाला एकही जागा मिळाली नाही. पण आम्ही एनडीएसोबत राहिलो,’ अशी आठवण आठवलेंनी करुन दिली.
मोदींविरुद्ध आवाज उठवा, दबाव वाढवा! संघाचा प्लान ठरला? ३ पर्याय तयार, सक्रिय झाला परिवार
‘लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला एकही जागा मिळाली नाही. पण तरीही आम्ही महायुतीचं काम केलं. आता मला कॅबिनेट मंत्रालय मिळायला हवं. सामाजिक न्याय मंत्रालय मिळाल्यास चांगलंच होईल. कामगार किंवा अल्पसंख्याक मंत्रालय मिळालं तरीही चालेल,’ असं म्हणत आठवलेंनी त्यांची इच्छा बोलून दाखवली.

रिपाईंला कॅबिनेट मंत्रालय मिळाल्यास दलित समाजात चांगली भावना निर्माण होईल, असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन दिली. ‘लोकसभेच्या जागावाटपात आम्ही तुम्हाला एकही जागा देऊ शकत नाही. पण मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये आम्ही तुम्हाला कॅबिनेट मंत्रिपद देऊ असं फडणवीस म्हणाले होते. तसं आश्वासन त्यांनी मला दिलं होतं,’ याची आठवण आठवलेंनी करुन दिली.

Source link

Devendra FadnavisModi governmentramdas athawalerpiआरपीआयदेवेंद्र फडणवीसमोदी सरकाररामदास आठवले
Comments (0)
Add Comment